नाशिकमध्ये अंबादास दानवे यांचा ट्रॅक्टरने प्रवास, फुटलेल्या बंधार्‍याची पाहणी

अंबादास दानवे ट्रक्टरप्रवास,www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
फुटलेल्या बंधार्‍याच्या दुरुस्तीसाठी काँक्रीटचा वापर करावा, घरांची पडझड, पिकांबरोबरच वाहून गेलेली शेती, शेतीसाहित्य आणि सिन्नर शहराप्रमाणेच ग्रामीण भागात पावसाचे पाणी घरात शिरल्याने झालेल्या नुकसानीचेही पंचनामे करा, अशा सूचना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रशासनाला केल्या. तसेच शेतकर्‍यांशी संवाद साधत व्यथा जाणून घेतल्या.

गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत सोनांबे शिवारातील गुरदरी बंधारा फुटल्याने बंधार्‍यासह शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. माजी आमदार राजाभाऊ वाजे, सरपंच डॉ. रवींद्र पवार यांच्या मागणीनंतर ना. दानवे यांनी सोमवारी (दि.5) सकाळी ट्रॅक्टरने जवळपास एक किमी प्रवास करून बंधार्‍याच्या नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

सोनांबे गावाच्या दक्षिणेला मुख्य रस्त्यापासून जवळपास अर्धा ते एक किमी आत गुरदरी बंधारा आहे. तेथे चारचाकी वाहने पोहोचू शकत नसल्याने ना. दानवे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी यांनी ट्रॅक्टरने प्रवास केला. पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी बंधार्‍याच्या दुरुस्तीसाठी 8.5 लाख रुपयांचे अंदाजपत्रक बनवल्याचे सांगितले. तथापि, केवळ मातीचा भराव टाकून चालणार नाही. सुधारित अंदाजपत्रक करून त्यात काँक्रीटने कामाची तरतूद करावी, अशा सूचना दानवे यांनी दिल्या.

यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, युवा नेते उदय सांगळे, दीपक खुळे, सरपंच डॉ. रवींद्र पवार, माजी सरपंच संजय बोडके, विकास पवार, सुभाष जोर्वे, पोलिसपाटील चंद्रभान पवार, नागेश्वर पवार, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष दामोधर बोडके, सोमनाथ पवार, अनिल पवार, योगेश पवार आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘बांधावर पंचनामे करावे’
शेतीसह पिकांच्या नुकसानीचे पंचनामे बांधावर जाऊन करावेत. टोमॅटोच्या नुकसानीत कारवी, बांबू, तार, मल्चिंग पेपर आदींच्या नुकसानीचा पंचनामा करावा. कारण या वस्तूंवर शेतकर्‍यांचा मोठा भांडवल खर्च झालेला असतो, असे ना. दानवे यांनी नमूद केले.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये अंबादास दानवे यांचा ट्रॅक्टरने प्रवास, फुटलेल्या बंधार्‍याची पाहणी appeared first on पुढारी.