नाशिकमध्ये आज अर्धा डझन मंत्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अर्धा डझन मंत्री पुढील तीन दिवस नाशिकच्या दौर्‍यावर येत आहेत. ना. फडणवीस हे मंगळवारी (दि.30) दौर्‍यावर येत आहेत. ऐन गणेशोत्सवात व्हीव्हीआयपींच्या दौर्‍याने शहर गजबजणार असल्याने यंत्रणा झाडून कामाला लागल्या आहेत.

डोंगरे वसतिगृह येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय महानुभाव संमेलनाला उपस्थिती लावण्यासाठी उपमुख्यमंत्री नाशिकमध्ये येत आहेत. दुपारी 2 ला त्यांचे संमेलनस्थळी आगमन होणार असून, त्यांच्या समवेत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेत. तर बुधवारी (दि.31) संमेलनाच्या समारोपाला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहतील. त्यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खनिकर्म व बंदरे विकासमंत्री दादा भुसे, माजी मंत्री जयकुमार रावल आदी हजेरी लावणार आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 1 सप्टेंबरला जिल्हा दौर्‍यावर येत असून, सकाळी 10 ला त्यांचे आगमन होईल. त्यानंतर लासलगाव येथील बांबू प्रदर्शनाला ते भेट देणार आहेत. दुपारी 3 ला भोसला मिलिटरी स्कूल येथे आयोजित कार्यक्रमाला राज्यपाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, एकीकडे गणेशोत्सवाची धामधूम असताना नाशिकमध्ये व्हीव्हीआयपींचा राबता असल्याने यंत्रणेवरील ताण वाढला आहे. या दौर्‍यात कोठेही कमतरता राहणार नाही, यासाठी महसूल व पोलिस विभाग सर्वतोपरी खबरदारी घेत आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये आज अर्धा डझन मंत्री appeared first on पुढारी.