नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण, बळीराजा हतबल

कांदा,www.pudhari.news

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगावसह जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांत लेट खरीप (रांगडा) कांदा विक्रीस येत असून, एकट्या लासलगाव बाजारात दररोज ४५ ते ५० हजार क्विंटल आवक होत आहे. त्यामुळे या लाल कांद्याचे दर घसरले असून, कमीत कमी ४००, जास्तीत जास्त १२११, तर सर्वसाधारण ७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही सुटत नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.

या कांद्याची टिकवण क्षमता कमी असल्याने बळीराजाला हा कांदा मिळेल त्या भावात विक्री करावा लागत आहे. या बाजारभावामुळे शेतकऱ्यांना खर्च, सरकारी, निमसरकारी संस्थांकडून घेतलेले कर्ज, त्यांची परतफेड आदी नियोजन करताना तारेवरची करसत करावी लागत आहे. यावर उपाययोजना करण्याची गरज शेतकरी व्यक्त करत आहेत. यात प्रामुख्याने 10 टक्के कांदा निर्यात प्रोत्साहन योजना पुन्हा सुरू करणे. उत्पादन खर्चाचा विचार करता शेतकऱ्यांना किमान 500 रुपये प्रतिक्विंटल अनुदान देणे. किंमत स्थिरीकरण निधीअंतर्गत नाफेडमार्फत तत्काळ कांदा खरेदी सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणे. देशांतर्गत किंवा परदेशात खरेदीदारांना ट्रान्स्पोर्ट सबसिडी देण्यासाठी प्रयत्न करणे. पाकिस्तान, बांग्लादेश व श्रीलंका या देशांनी भारताकडून थेट कांदा खरेदी बंद केली आहे. त्यामुळे इतर या देशांसह इतर देशांमध्ये कांदा निर्यात करण्यासाठी निर्णय घ्यावा. रेल्वेद्वारे कांदा पाठविण्यासाठी रॅक उपलब्ध करून देणे. व्यापारीवर्गास कंटेनर उपलब्ध करून देणे.

तसेच भारतीय निर्यातदारांना त्यांनी पाठविलेल्या मालाची रक्कम त्या-त्या देशातील चलनामध्ये अथवा डॉलरमध्ये मिळते. मात्र, येथील निर्यातदारांना सदर चलनातील रक्कम पुन्हा भारतीय चलनात परावर्तित करून घ्यावी लागते. अशावेळी डॉलरचे भाव सतत बदलत असल्याने निर्यातदारांना अनेक वेळा तोट्यास सामोरे जावे लागते. याबाबतही काही धोरण ठरविण्याची गरज आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण, बळीराजा हतबल appeared first on पुढारी.