नाशिकमध्ये गणरायाच्या आगमनापूर्वीच चैतन्यपर्व, तयारीला वेग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्रीगणरायाच्या आगमनाला अवघे सहा दिवस राहिल्याने आरास आणि देखाव्यांच्या तयारीला वेग आला आहे. मोठ्या गणेश मंडळांच्या मंडप उभारणीच्या कामाला गती देण्यात आली असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण बघावयास मिळत आहे. बाजारातही खरेदीसाठी नागरिकांकडून गर्दी केली जात असल्याने गणरायाच्या आगमनापूर्वीच चैतन्यपर्व सुरू झाले आहे.

दुसरीकडे बाजारात जागोजागी गणरायाच्या सुबक आणि लोभस मूर्ती भक्तांचे लक्ष आकर्षित करीत आहेत. तर अद्याप ज्या मूर्ती बाजारात दाखल झालेल्या नाहीत, त्या मूर्तींना रंगरंगोटी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहर व परिरात गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गणेशोत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला गेला. उंच मूर्ती नको, आरास पाहण्यासाठी गर्दी नको, दोन व्यक्तींमध्ये सामाजिक अंतर हवे, वारंवार हात धुणे, मास्क लावणे, शक्यतो घराबाहेर न पडणे असे विविध निर्बंध असल्याने, हा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला गेला. यंदा असे कोणतेही निर्बंध नसल्याने गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह संचारल्याचे दिसून येत आहे. मोठ्या मूर्ती घेण्यावर तसेच सामाजिक आरास अधिकाधिक चांगल्या प्रकारे करण्यावर मंडळांकडून भर दिला जात आहे. त्यातच आगामी निवडणुका लक्षात घेऊन बहुतांश गणेश मंडळांनी वर्गणी जमा करून यंदा कोणकोणते उपक्रम राबवायचे तसेच रोषणाई आणि आरास यांचे बजेट काढून गणेशोत्सवाची तयारी सुरू केली आहे.

प्रशासन स्तरावरदेखील ऑनलाइन आणि ऑफलाइन परवानग्या दिल्या जाणार असल्याने, यंदा गणेश मंडळांची संख्यादेखील वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकूणच गणरायाच्या आगमनानेच सर्वत्र चैतन्यपर्व सुरू झाल्याने, यंदाचा उत्सव हा दणक्यात साजरा करण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत.

बाजारपेठेत दुकाने थाटली
गणेशोत्सवासाठी लागणारे विविध डेकोरेशनचे साहित्य बाजारात विक्रीस आले आहे. थर्माकोलपासून बनविलेल्या साहित्यांना बंदी आहे. यामुळे इतर पर्याय वापरून डेकोरेशनचे साहित्य, फुलांच्या माळा, रोषणाई आदी सजावटीचे साहित्य बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे. गणपतीची पूजा, गुलाल, लहान पाट, लाल रंगाचे आसन, पूजनासाठी लागणार्‍या वस्तूंची दुकाने बाजारपेठेत थाटण्यात आली आहेत.

The post नाशिकमध्ये गणरायाच्या आगमनापूर्वीच चैतन्यपर्व, तयारीला वेग appeared first on पुढारी.