नाशिकमध्ये गांजामिश्रित माव्याची सर्रास विक्री, शाळकरी मुलेही कचाट्यात

गांजामिश्रित मावा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आतापर्यंत सुगंधी तंबाखू, चुना आणि सुपारीचे मिश्रण करून बनविला जाणार्‍या माव्याची पानटपर्‍यांवर सर्रास विक्री केली जात होती. मात्र, आता गांजाचे पाणीमिश्रित माव्याची खुलेआम विक्री केली जात असून, रेडीमेड मावा पानटपर्‍यांना पुरविला जात आहे. चिंताजनक बाब म्हणजे तरुणाईसह शाळकरी मुले माव्याच्या नशेत धुंद होत आहेत. या सर्व प्रकाराकडे मात्र अन्न व औषध प्रशासनाकडून सपशेल दुर्लक्ष केले जात असल्याने, नशेचा हा धंदा सध्या जोरदार सुरू आहे.

सध्या जिल्ह्यातील बहुतांश पानटपर्‍यांवर गांजाचे पाणीमिश्रित मावा विक्री केला जातो. गांजासह सुगंधी तंबाखू गरम पाण्यात उकळली जाते. त्याचे पाणी, गावरान तंबाखू, चुना आणि बारीक सुपारीचे मिश्रण तयार करून हा मावा विकला जातो. हा मावा किक मावा, झटका मावा, गरम विलायची, कडक यासह अन्य नावांनी प्रसिद्ध असून, तरुणांमध्ये हे सर्व नावे सध्या चांगलेच प्रसिद्ध होताना दिसत आहेत. माव्याच्या छोट्या पुडीसाठी 10 ते 20 रुपये आकारले जात असले तरी, यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची बाबही समोर येत आहे. शहरासह ग्रामीण भागातील पानटपर्‍यांवर हा मावा सहज उपलब्ध होतो. पानटपरीचालकांना हा मावा पुरविण्यासाठी काही डिलर कार्यरत असून, मागणीनुसार रातोरात पानटपर्‍यांवर हा मावा पुरविला जातो. डिलरकडून हा मावा पानटपरीचालकांना किलोत विकला जातो. त्यानंतर पानटपरीचालकांकडून त्याच्या छोट्या पुड्या तयार करून ग्राहकांना पांढर्‍या रंगाच्या कॅरिबॅगवर घासून दिला जातो.

तक्रार करा मगच कारवाई 

अन्न व औषध प्रशासनाकडे मनुष्यबळाचा अभाव असल्याने, जिल्हाभरात कारवाईची मोहीम राबविणे अवघड असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. मात्र, जर एखाद्याने तक्रार केल्यास, संबंधितांवर नक्की कारवाई केली जाईल, अशी भूमिका प्रशासनाची आहे. याबाबत प्रशासनाच्या काही अधिकार्‍यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, सर्वांनीच मनुष्यबळाचे कारण पुढे केले. त्यामुळे सामान्य नागरिकांना बघ्याची भूमिका घेणे क्रमप्राप्त झाले आहे.

सुपारीपासून मावा तयार केला जात असून, त्याकरिता लागणारी सुपारी दर्जेदार असायला हवी. ही सुपारी बाहेरून आणली जात असून, सुपारीचे बारीक तुकडे करून ते पानटपरीचालकांना पुरविले जातात. त्यानंतर पानटपरीचालक मावा तयार करून ग्राहकांना विकतात. यातून पानटपरीचालक लाखो रुपयांची कमाई करीत आहेत. काही पानटपरीचालक तर या माव्यासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, अशातही अन्न व औषध प्रशासन अनभिज्ञ आहे.

हा मावा आरोग्यासाठी प्रचंड घातक असून, त्यापासून अनेक घातक आजारांची लागण होते. मात्र, अशातही अनेक जण नशा भागविण्यासाठी या माव्याच्या आहारी जाताना दिसत आहेत. दरम्यान पोलिस आणि अन्न, औषध प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये गांजामिश्रित माव्याची सर्रास विक्री, शाळकरी मुलेही कचाट्यात appeared first on पुढारी.