नाशिकमध्ये गोवरची लक्षणे असलेले चार संशयित रुग्ण

गोवर,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक शहरातही आता गोवरचे चार संशयित रुग्ण आढळून आल्याने महापालिकेची आरोग्य वैद्यकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. वैद्यकीय विभागाने चारही संशयित बालकांच्या रक्ताचे नमुने मुंबईतील हाफकीन लॅबमध्ये तपासणीसाठी रवाना केले असून, तपासणी अहवाल काय येतो याकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागून आहे. संबंधित बालके बाधित आढळून आल्यास शहरात तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरामध्ये गोवर या संसर्गजन्य आजाराचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे. विषाणूपासून पसरणारा हा आजार असल्याने त्यापासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन यंत्रणांमार्फत केले जात आहे. मुंबईनंतर मालेगाव शहरात गोवरचे काही रुग्ण आढळून आले आहेत. आता मालेगावनंतर नाशिकमध्येही गोवरचे लक्षणे असलेले काही संशयित रुग्ण मनपाच्या वैद्यकीय विभागाने शहरातील काही भागांत केलेल्या तपासणीत आढळून आले आहेत. त्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबईतल्या हाफकीन लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. मनपा हद्दीत गोवरचा शिरकाव झाल्यास त्यावर मात करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज झाली असून, महापालिकेने गोवरच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात संसर्गजन्य कक्ष तयार ठेवला आहे. तसेच आवश्यकता वाटल्यास बिटकोतील बालरोग कक्षदेखील गोवरच्या रुग्णांसाठी वापरला जाऊ शकतो, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागरगोजे यांनी स्पष्ट केले.

मनपाच्या बाह्यरुग्ण तपासणीमध्ये गोवरची लक्षणे असलेले चार संशयित रुग्ण आढळून आले आहे. असे असले तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. आरोग्य वैद्यकीय विभाग योग्य ती काळजी घेत आहे. संशयितांच्या रक्ताचे नमुने मुंबईला तपासणीस पाठविले आहे.

– डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, मनपा

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये गोवरची लक्षणे असलेले चार संशयित रुग्ण appeared first on पुढारी.