नाशिकमध्ये पतंगोत्सवाला गालबोट, नायलॉन मांजाने तिघे जखमी

नाशिक पंतगोत्सवाला गालबोट,wwwpudhari.news

नाशिक : टीम पुढारी

मकरसंक्रांतीच्या पतंगोत्सवाला नायलॉन मांजामु‌ळे गालबोट लागले आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी या मांजामुळे गळा, गाल कापल्याने तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जिल्ह्यात वावी (सिन्नर), वणी येथे बोरीचा पाडा आणि दिंडोरी येथे अनुक्रमे शेतकरी, तरुण आणि शाळकरी मुलगी जखमी झाले आहेत. शाळकरी मुलीवर नाशिकला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पतंगोत्सवाला गालबोट लावणारी घटना तालुक्यातील वावी येथे घडली. दळण दळण्यासाठी दुचाकीवरून जाणार्‍या शेतकर्‍याचा नायलॉन मांजाने गाल चिरल्याची घटना सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. दगू नाना वाघ (50, रा. कहांडळवाडी, ता. सिन्नर) असे जखमी शेतकर्‍याचे नाव आहे. कहांडळवाडी येथील दगू वाघ हे काल सायंकाळी कहांडळवाडी येथून वावी येथे धान्य दळण्यासाठी दुचाकीवरून जात असताना नूतन विद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ वावी-कहांडळवाडी रस्त्यावर त्यांच्या दुचाकीत मांजा अडकला. चेहर्‍यावर मिश्या आणि नाकाच्या खालच्या भागात वाघ यांच्या गालाला मोठी जखम झाली. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांनी वावी येथे खासगी दवाखान्यात धाव घेतली. वावी येथे प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सिन्नर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. एक सेंटिमीटर खोल व पाच सेंटिमीटर लांब जखम झाल्याने 8 ते 10 टाके टाकण्यात आले.

तरुणाची मान कापली

वणी : वणी-कळवण रस्त्यावरून येथील बोरीचा पाड्याजवळ दुचाकीस्वाराची नायलॉन मांजामुळे मान कापली जाऊन गंभीर दुखापत झाली. सायंकाळी पाचच्या दरम्यान कृष्णा चव्हाण (वय ३०, रा. चामदरी) हा तरुण दुचाकीवरून चामदरी येथून वणीला येत होता. वणी-कळवण रस्त्यावर बोरीचा पाडा दरम्यान नायलॉन मांजा त्याच्या मानेला अडकून ती कापली गेली. मानेला काहीतरी जाणवले असता हाताने मांजा पकडला असता त्याची तीन बोटेही कापली गेली. त्याने तत्काळ दुचाकी थांबवली, परंतु मानेतून जोरात रक्तस्त्राव सुरू झाला होता. रस्त्यावरून त्याचवेळी जात असणारे अहिवंतवाडीचे सरपंच दिनकर बागूल व चामदरीचे पोलिसपाटील प्रकाश गायकवाड यांनी अन्य नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डाॅ. बुरड यांनी सांगितले की, मानेला झालेली दुखापत गंभीर आहे. त्याची श्वासनलिका थोडक्यात वाचली. त्याच्यावर योग्य उपचार चालू आहेत.

दिंडोरीत मुलीचा गळा कापला

दिंडोरी : नायलॉन मांजाने दिंडोरी शहरातील लहान मुलीचा गळा चिरला असून, तिला नाशिक शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अनिसा शेख (वय १०) ही संध्याकाळी आपल्या काकांसमवेत दुचाकीवरून घरी जात होती. रस्त्यावर आडवा असलेला मांजा थेट तिच्या गळ्याला अडकून गळा कापला गेला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने अनिसाला स्थानिक दवाखान्यात नेण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. काळे यांनी तिच्यावर प्राथमिक उपचार केले. जखम मोठी असल्याने पुढील उपचारासाठी तिला नाशिक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रंगामुळे मांजा दिसतच नाही

पोलिसांनी दुकानदारांना ताकीद देऊनही दुकानदारांनी मांजाची सर्रास विक्री करत त्यांच्या ताकिदीला हरताळ फासला आहे. या मांजाचे रंग हे करडा, लाइट चॉकलेटी असल्याने ते अजिबात दिसत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांचे सर्रास गळे कापले जात आहेत. पुढील दोन-चार दिवसांत सर्वच दुचाकीस्वारांनी वाहन चालविताना खबरदारी घ्यावी, तसेच शक्यतो हेल्मेट आणि गळ्याभोवती रुमाल वापरण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा : 

The post नाशिकमध्ये पतंगोत्सवाला गालबोट, नायलॉन मांजाने तिघे जखमी appeared first on पुढारी.