नाशिकमध्ये परदेशी विद्यार्थ्यांना एजंटकडून गंडा, जीवे मारण्याची दिली धमकी

money fraud

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भारतीय संस्कृतीबद्दल शिक्षण घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतून नाशिकला आलेल्या विद्यार्थ्यांना एका एजंटने आर्थिक गंडा घालत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या एजंटने विद्यार्थ्यांकडून डिपॉझिटचे पैसे घेत ते घरमालकास न देता पैशांचा अपहार करीत गंडा घातल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गणेश पांडुरंग पाटील (२५, रा. खुटवडनगर) व निखिल प्रकाश मुदिराज (३७, रा. गोविंदनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिकेतील रहिवासी मोसेस टोटलीसंग बाबालोला (२१) हा तरुण शिक्षणासाठी भारतात आला असून, तो सध्या गंगापूर रोड भागातील आस्था रेसिडेन्सी येथे वास्तव्यास आहे. मोसेस याने सप्टेंबरमध्ये गणेश पाटील व निखील मुदिराज यांच्यामार्फत गंगापूर रोडवरील सदनिका भाडेतत्त्वावर घेतली. या व्यवहारासाठी घरमालकास डिपॉझिट द्यावे लागेल, असे सांगत संशयित पाटील व मुदिराज यांनी मोसेस याच्याकडून ६० हजार रुपये, तर इतर विद्यार्थ्यांकडूनही तीन लाख ३७ हजार रुपये घेतले. या विद्यार्थ्यांना सोमेश्वर, गंगापूर रोड परिसरात भाडेतत्त्वावर सदनिका घेऊन दिल्या. दरम्यान, पाटील व मुदिराज यांनी विद्यार्थ्यांकडून डिपॉझिटपोटी घेतलेले लाखो रुपये घरमालकांना न देता स्वत:कडेच ठेवले. त्यानंतर घरमालकांनी विद्यार्थ्यांकडे डिपॉझिटची रक्कम मागितल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पाटील व मुदिराज यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, दाेघांनीही पैसे देण्यास टाळाटाळ करीत फोन स्वीकारले नाही व कार्यालयही बंद केले. सोमवारी (दि.२१) मोसेस याने गणेश पाटील यास फोन केला असता गणेशने जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मोसेस याने मुंबईनाका पोलिसांकडे धाव घेत दोघांविरोधात फसवणूक, अपहाराची फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित निखिल मुदिराज यास अटक केली आहे.

डिपॉझिटच्या नावाखाली गोळा केले पैसे

मोसेस बाबालोला याने दिलेल्या माहितीनुसार, त्याने संशयित गणेश पाटील याला १७ हजार ऑनलाइन पद्धतीने दिले. तर, संशयित मुदिराजला ४३ हजार रोख स्वरूपात पैसे दिले. मोसेस याचा मित्र डरायस गोल याने २५ हजार, डेटीमले एबार याने १० हजार, डेविड डेमीने ५५ हजार, बुसीने ५५ हजार, बरनाडोने ४२ हजार, लॉरिनने ३० हजार आणि नोबर्ट याने ६० हजार रुपये दोन्ही संशयितांना दिले. हे एकूण तीन लाख ३७ हजार रुपये संशयितांनी डिपॉझिट स्वरूपात घेत ते घरमालकास न देता स्वत:कडे ठेवले. या पैशांचे संशयितांनी काय केले, याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये परदेशी विद्यार्थ्यांना एजंटकडून गंडा, जीवे मारण्याची दिली धमकी appeared first on पुढारी.