नाशिकमध्ये भीषण अपघात; पाच विद्यार्थ्यांचा करुण अंत

अपघात

सिन्नर; पुढारी वृत्तसेवा : नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर येथील मोहदरी घाटात कारचे टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात पाच विद्यार्थ्यांचा करुण अंत झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 9) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. नाशिकच्या सिडको, पाथर्डी फाटा परिसरतील हे विद्यार्थी आहेत.

हर्ष ऊर्फ आदित्य दीपक बोडके (वय 17, रा. कामटवाडे, सिडको, नाशिक), सायली अशोक पाटील (17, रा. राणेनगर, सिडको, नाशिक), प्रतीक्षा दगू घुले (17, पाथर्डी फाटा, नाशिक), मयुरी अनिल पाटील (16, रा. त्रिमूर्ती चौक, सिडको, नाशिक), शुभम तायडे (17, शिवशक्ती चौक, सिडको, नाशिक) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.

अपघात इतका भीषण होता की, अपघातग्रस्त गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघातात तीन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे. अपघातात साक्षी नितीन घायाळ (18, पाथर्डी फाटा, नाशिक) व साहिल गुणवंत वारके (18, रा. लक्ष्मी रेसिडेन्सी, पाथर्डी फाटा, नाशिक) या दोन विद्यार्थ्यांसह अन्य वाहनांतील गायत्री अनिल फरताळे (रा. उंटवाडी, नाशिक)व सुनील ज्ञानेश्वर दळवी (रा. पुणे) जखमी झाले आहेत. प्राथमिक उपचारानंतर जखमींना नाशिक येथे हलविण्यात आले.

सिन्नरकडून नाशिकच्या दिशेने भरघाव वेगाने येत असलेल्या कारचा (एमएच 03 एआर 1615) टायर फुटला आणि ती विरुद्ध दिशेला जात डिव्हायडर ओलांडून थेट दोन कारवर जाऊन आदळून उलटली. त्यात पाचजणांचा मृत्यू झाला.

दरम्यान, रवींद दगा माळी (45, रा. वारकुंडाने, ता. जि. धुळे) यांच्या फिर्यादीवरून स्विफ्ट चालक हर्ष बोडके याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा :

The post नाशिकमध्ये भीषण अपघात; पाच विद्यार्थ्यांचा करुण अंत appeared first on पुढारी.