नाशिकमध्ये मद्यधुंद प्राध्यापकाची सैराट कार ड्राइव्ह, अनेकांना उडवले

कारड्राईव्ह,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाविद्यालयीन प्राध्यापकाने मद्यसेवन करून उपनगर-लेखानगर-चांडक सर्कलपर्यंत भरधाव कार चालवत नागरिकांना जखमी केले. पोलिसांसह नागरिकांनी कारचालकास थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने समोर येईल त्याच्या अंगावर कार घालून त्यांचा जीव धोक्यात घातला. गुरुवारी (दि.17) सायंकाळी साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान हा संतापजनक प्रकार घडला. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईनाक्यापासून कारचे पुढील टायर फाटून निघून गेले तरी चालकाने लोखंडी व्हीलवर सुमारे दीड किलोमीटर कार चालवत वाहनांना धडक दिली.

साहेबराव दौलत निकम (रा. मेरी) असे या मद्यधुंद चालकाचे नाव असून, तो बिटको महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्राध्यापक असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकम एमएच जीएक्स 3096 क्रमांकाच्या कारमधून नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयाजवळून निघाला. त्यानंतर तो अशोका मार्गवरून लेखानगरच्या दिशेने गेला. दरम्यान, त्याने डीजीपीनगर परिसरात एका वाहनास धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर तो लेखानगरला भरधाव गेला असता नागरिकांनी त्याचा पाठलाग सुरू केला. लेखानगर येथेही दोघांना उडवत निकमने त्याची कार भरधाव चालवत गोविंदनगर बोगद्याजवळ आणली व तेथेही एकास धडक दिल्याचे समोर येत आहे. त्यानंतर मुंबईनाका परिसरात कारचे डाव्या बाजूकडील पुढील चाकाचे टायर निघून गेल्याने लोखंडी व्हील उरले. तरीदेखील निकमने त्याच अवस्थेत कार चालवत इतरांचा जीव धोक्यात घातला. मुंबई नाक्याहून चांडक सर्कल येथून तो स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाच्या दिशेने गेला. दरम्यान, गोल्फ क्लबच्या जवळील रस्त्यावर उभ्या वाहनांना धडक दिली. तसेच समोर येईल त्यास त्याने धडक दिली. त्यात अविनाश प्रल्हाद साळुंके (45, रा. नवशा गणपतीजवळ, गंगापूर रोड) यांच्या दुचाकीस धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर दुचाकीवरून येणार्‍या पंकज शंकर मोरे (27, रा. विजयनगर, सिडको) व गणेश सत्या या दोघा युवकांना निकमने धडक दिली. त्यात पंकजच्या दोन्ही पायांवरून कार नेल्याने त्यास गंभीर दुखापत झाली आहे. वाहने आणि माणसांना कारखाली चिरडत निकमने त्याची कार मायको सर्कलच्या दिशेने नेली. त्यानंतर चांडक सर्कल व शासकीय विश्रामगृहापर्यंत कार नेत तेथून निकमने यू टर्न घेतला. पुन्हा चांडक सर्कल येथे आल्यानंतर नागरिक व पोलिसांनी नाकाबंदी करण्यास सुरुवात केल्याने त्याने चांडक सर्कलला गोल गोल फेर्‍या मारत नागरिकांचा जीव धोक्यात घातला. अखेर पोलिसांनी त्यांचे शासकीय वाहन आडवे लावल्याने निकमची कार वाहनावर जाऊन आदळली. त्यानंतर पोलिसांनी निकमला ताब्यात घेत मुंबईनाका पोलिस ठाण्यात नेले. तर जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड पोलिस ठाण्यात निकम विरोधात गुन्हा दाखल करण्यात येत होता, तसेच त्याची कारही जप्त करण्यात आली आहे.

विवाह सोहळ्याआधी अपघात :

कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या पंकजच्या बहिणीचा काही दिवसांत सिडकोत विवाह होणार आहे. पंकज आणि गणेश सत्या हे दोघे समर्थ आयटी सोल्युशन कंपनीत कामास असून, काम संपवून ते जात होते. विवाहकार्यामुळे पंकजने गुरुवार (दि.17)पासून सुट्टी घेतली. मात्र, त्याचा अपघात झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

वायरलेसवरून पाठलाग :

पोलिसांना मद्यधुंद चालकाची माहिती मिळताच पाठलाग सुरू केला. लेखानगर परिसरात पोलिसांनी त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने हुलकावणी देत कार जोरात पळवली. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग करीत वायरलेसवरून पोलिसांना सूचना देत सतर्क केले. निकम मुंबई नाक्याच्या दिशेने येत असल्याचे समजताच पोलिसांनी परिसरात वाहने उभी केली. मात्र, तेथूनही त्याने हुलकावणी देत चांडक सर्कल, मायको सर्कल परिसरात वाहनांना धडक देत तिघांना जखमी केले. अखेर चांडक सर्कलला त्यास अडवण्यात आले.

नागरिक संतप्त :

या घटनेमुळे काही नागरिक निकमच्या कारचा पाठलाग करीत त्यास थांबवण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, त्याने कोणालाही जुमानले नाही. समोर येईल त्यास धडक मारत असल्याने अनेकांनी त्याच्या कारपासून अंतर ठेवले. तर काही संतप्त नागरिकांनी त्याच्या कारवर दगड मारून थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही निकमने कार थांबवली नाही. निकमला थांबवल्यानंतर संतप्त नागरिकांनी घोळका केला. अनेकांनी थोडक्यात जीव वाचला म्हणून सुटकारा सोडला, तर काहींनी निकमच्या कारला पाय मारून संताप व्यक्त केला.

भीतीदायक प्रवास 

बटको महाविद्यालय- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – डीजीपीनगर – अशोका मार्ग – लेखानगर – मुंबई नाका – चांडक सर्कल – जलतरण तलावासमोरील सिग्नल – मायको सर्कल – चांडक सर्कल – शासकीय विश्रामगृह – पुन्हा चांडक सर्कलवर दोन ते तीन फेर्‍या मारून पोलिसांच्या वाहनावर आदळला.

आम्ही आमची दुचाकी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत कारची धडक बसली. त्यात माझा मित्र पंकज याच्या पायांवरून कार गेल्याने त्यास गंभीर दुखापत झाली आहे. तर मलाही दुखापत झाली आहे.
गणेश सत्या, जखमी

 

मुंबईनाका येथून कारचा पाठलाग करीत त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र कारचालक थांबला नाही. कारचे टायर फुटले तरी कार चालवून समोर येईल त्यास धडक देत कार नेत होता. त्यामुळे अनेकांना दुखापत झाली आहे. पोलिसांनी चालकावर कठोर कारवाई करावी.
– सय्यद तंजीम, प्रत्यक्षदर्शी

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये मद्यधुंद प्राध्यापकाची सैराट कार ड्राइव्ह, अनेकांना उडवले appeared first on पुढारी.