नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रंगणार महानुभाव संमेलन

चक्रधर स्वामी, नाशिकमध्ये महानुभव संमेलन www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भगवान श्री चक्रधरस्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सवानिमित्त नाशिकमध्ये 29 ते 31 ऑगस्ट असे तीनदिवसीय अखिल भारतीय महानुभाव संमेलन आयोजित करण्यात आले आहे. गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह येथील श्री चक्रधरनगर येथे संमेलन होणार आहे, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकर पाटील यांनी दिली. संमेलनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मंत्री उपस्थित राहणार आहेत.

श्री चक्रधरनगर येथे शुक्रवारी (दि.26) आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी दिनकर पाटील बोलत होते. यावेळी आचार्य प्रवर चिरडे बाबा, महंत श्रीकृष्णाराज बाबा मराठे, माजी आमदार बाळासाहेब सानप, संमेलनाचे सचिव प्रकाश घुगे, खजिनदार प्रकाश ननावरे, प्रभाकर भोजने आदी उपस्थित होते.

दिनकर पाटील म्हणाले की, संमेलनात तीन दिवस भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री चक्रधरस्वामींचे आचार-विचार आजही प्रेरणादायी आहेत. महानुभाव पंथाची अधिक ओळख व सखोल माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी म्हणून संमेलनात पंथावरील व चक्रधरस्वामी आणि पंचावतार यांच्या विषयी जुने ग्रंथ, पोथी आणि साहित्य यावरील 15 स्टॉल्स उभारण्यात येतील, असे पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याची हजेरी
दिनकर पाटील यांनी सांगितले की, संमेलनास प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी (दि.31) येणार आहेत. मंगळवारी (दि.30) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. याशिवाय उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे, गुजरातचे जलसंपदामंत्री जितुभाई चौधरी, शरदराव ढोले यांच्यासह अन्य मंत्री संमेनलास उपस्थिती लावणार आहेत.

मागण्या मांडणार : चिरडे बाबा
संमेलनानिमित्ताने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे भरवस (गुजरात) येथील चक्रधरस्वामींची जन्मभूमी महानुभाव अनुयायांना दर्शनासाठी मुक्त करावी. श्री चक्रधरस्वामींच्या जन्मदिनी सार्वजनिक सुटी घोषित करावी. श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे दरवर्षी शासकीय महापूजा करण्यात यावी. चक्रधरस्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तीर्थक्षेत्रांचा विकास करावा. महानुभाव संत व भाविकांसाठी प्रत्येक गावात दफन विधीसाठी जागा मिळावी. श्रीक्षेत्र ऋद्धपूर येथे मराठी विद्यापीठ उभारावे. तसेच श्री चक्रध स्वामी अष्टशताब्दी वर्ष शासन दरबारी साजरे करावे, आदी मागण्या केल्या जाणार असल्याचे चिरडे बाबा यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रंगणार महानुभाव संमेलन appeared first on पुढारी.