नाशिकमध्ये मोबाइल साहित्य विक्रेत्यांकडून ग्राहकास बेदम मारहाण

नाशिक: मोबाईल साहित्य विक्रेत्यांकडून मारहाण,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मोबाइलचे कव्हर खरेदी न केल्याची कुरापत काढून महात्मा गांधी रोडवरील मोबाइल साहित्य विक्रेत्यांनी एका ग्राहकास बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि.२४) दुपारी घडली. या घटनेने मोबाइल साहित्य विक्री करणाऱ्यांच्या अरेरावीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मोबाईल साहित्य विक्रेत्यांकडून ग्राहकास मारहाण(छाया-हेमंत घोरपडे)

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एक युवक मोबाइलचे कव्हर खरेदी करण्यासाठी एका दुकानात गेला. मात्र त्यास कव्हर पसंद न पडल्याने त्याने कव्हर घेतले नाही. त्यामुळे आमचा वेळ वाया घालवला अशी कुरापत काढून तेथील परप्रांतीय दुकानदारांनी गोळा होऊन युवकास दमदाटी करीत बेदम मारहाण केली. भररस्त्यात हा प्रकार झाल्याने तेथे बघ्यांची गर्दी जमली होती तसेच काही वेळ वाहतूक कोंडीही झाली. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या युवकाची सुटका केली. याआधीही मोबाइल साहित्य विक्रेत्यांकडून खरेदीसाठी अरेरावी केली जात असल्याचे आरोप नागरिकांकडून झाले आहेत. तसेच दुकानदारांकडील ई कचरा एका ठिकाणी गोळा करून ठेवत असल्याने परिसरात आगीची घटनाही घडली हाेती.

पोलिस आले उशिरा…छायाचित्रकारांनाही दमदाटी

ही घटना घडल्यानंतर पोलिस अर्धा तास उशिराने आल्याचा आरोप होत आहे. त्याचप्रमाणे या घटनेचे छायाचित्रण करणाऱ्या छायाचित्रकारांनाही विक्रेत्यांनी दमदाटी केली.

The post नाशिकमध्ये मोबाइल साहित्य विक्रेत्यांकडून ग्राहकास बेदम मारहाण appeared first on पुढारी.