नाशिकमध्ये विस्तारतेय वेअरहाउसचे जाळे

Wair House www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

‘गोदाम’ ही संकल्पना प्रत्येकास माहिती आहे. याच गोदामांना बुद्धिमान, कार्यक्षम आणि स्वयंचलित सुविधांमध्ये बदलून ‘वेअरहाउस’ ही संकल्पना पुढे आली असून, उद्योगवाढीसाठी ती फायदेशीर ठरताना दिसत आहे. आतापर्यंत राष्ट्रीय सकल देशांतर्गत उत्पादनात १३ टक्के टक्के वाटा असलेल्या भिवंडीच्या यंत्रमान आणि गोदाम उद्योगाचा नाशिकच्या उद्योजकांना आधार होता. मात्र, आता नाशिकमध्येच जागतिक दर्जाच्या वेअरहाउसचे जाळे विस्तारत असल्याने, गुंतवणुकीसाठी ते फायदेशीर ठरताना दिसत आहे. एकट्या महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीचेच जिल्ह्यात ७ पेक्षा अधिक वेअरहाउस आहेत.

उद्योगांबरोबरच ई-कॉमर्सच्या वाढीमुळे स्टॉक कीपिंग युनिट्सचे व्यवस्थापन करण्याची गरज निर्माण झाली आहे. या गरजा वेअरहाउसच्या माध्यमातून पूर्ण होत असल्याने, नाशिकमध्ये वेअरहाउस ही संकल्पना पुढील काळात मोठ्या रुजण्याची शक्यता आहे. कारण नाशिकच्या व्यापारी, उद्योजकांना भिवंडी येथील वेअरहाउसचा आतापर्यंत आधार मिळत गेला. मात्र, नाशिकचा माल भिवंडी स्थित वेअरहाउसमध्ये ठेवणे अधिक खर्चिक असल्याने नाशिकमध्येच अशा प्रकारच्या वेअरहाउसचे जाळे विस्तारण्याची मागणी उद्योजकांकडून सातत्याने होत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडने तब्बल १ लाख चौरस फुटांचे वेअरहाउस नाशिकच्या उद्योजकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. ई-कॉमर्स, ग्राहकोपयोगी वस्तू, उत्पादन व अभियांत्रिकी उद्योग क्षेत्रांना हे वेअरहाउस प्रचंड फायदेशीर ठरणार आहे. बिल्ट-टू-सूट (बीटीएस) पद्धतीचे हे वेअरहाऊस पर्यावरण संरक्षण व संवर्धन मानकांनुसार डिझाईन करण्यात आले आहे. यामध्ये रिसायकल करण्यात आलेल्या बांधकाम साहित्याचा वापर, द्रव कचऱ्याचे व्यवस्थापन, नूतनीकरणीय ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापन आणि अत्याधुनिक ऑटोमेशन यांचा समावेश आहे. वेअरहाउसमध्ये ऑनसाइट सोलर ऊर्जा निर्मिती क्षमता असून, त्याद्वारे ऊर्जेच्या संपूर्ण गरजा पूर्ण केल्या जातात. कार्गो वाहने आणि व्यक्तिगत वाहनांसाठी सोलर चार्जिंगची क्षमतादेखील यामध्ये आहे. वास्तविक, अशा प्रकारच्या सुविधा जागतिक स्तरावरील वेअरहाउसमध्ये उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, आता या सुविधा नाशिकमध्येही उपलब्ध करून दिल्याने, बाहेरील उद्योगांना त्या आकर्षिक करीत आहेत. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे एकट्या महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडचे जिल्हाभरात एकूण ७ वेअरहाउसेस आहेत. ज्या गतीने नाशिकमध्ये उद्योगांचे जाळे विस्तारत आहेत, त्यावरून पुढच्या काळातदेखील आणखी जागतिक दर्जाचे वेअरहाउस उभारण्याचा महिंद्रा लॉजिस्टिक्सचा मानस आहे.

ई-कॉमर्स अन् गोदामे

नाशिकमध्ये ई-कॉमर्स कंपन्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारत असल्याने, वाढीव स्टॉक ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोदामांचा वापर केला जात आहे. हे गोदामे विशेषत: शहराच्या बाहेरील बाजूस नव्याने विकसित होणाऱ्या भागात उभारल्याचे दिसून येतात. मात्र, याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशा उपाययोजना नसल्याने, ते धोकादायक ठरू शकतात. विशेषत: आगप्रतिबंधक उपाययोजना प्रभावी नसल्याने, किरकोळ आगीच्या घटनांमध्येदेखील मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. अशात विक्रेत्यांच्या मनात सदैव धाकधूक असते. त्या तुलनेत वेअरहाउस चांगला पर्याय ठरू शकतात.

नोकऱ्यांची संधी

लॉजिस्टिक आणि वेअरहाउसिंगमुळे नोकऱ्यांची मोठी संधी निर्माण होणार आहे. महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडने २० कोटी रुपये गुंतवून उभारलेल्या वेअरहाउसमुळे तब्बल ३५० ते ४०० तरुणांना रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे वेअरहाउसिंग आणि लॉजिस्टिक विभागाची वाढ अर्थव्यवस्थेवर स्पिलओव्हर प्रभाव पडेल, ज्यामुळे लहान शहरांमध्ये घरांची मागणीदेखील वाढेल. परिणामी रिअल इस्टेटलादेखील बूस्ट मिळेल. टीयर-२ आणि टीयर-३ शहरात वेअरहाउस ही संकल्पना मोठ्या प्रमाणात रुजू होताना दिसत आहे.

लॉकडाऊनमुळे महत्त्व अधोरेखित

लॉकडाऊनमुळे वेअरहाउसचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित झाले. या काळात कंपन्यांमध्ये नवे उत्पादन ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नव्हती. नव्या उत्पादनाची सुरक्षा हादेखील उद्योजकांना भेडसावणाऱ्या प्रश्न होता. अशात वेअरहाउसबरोबरच गोदामांना मोठी मागणी होती. दळणवळण ठप्प असल्याने, एकाच ठिकाणी माल साठवून ठेवण्याशिवाय पर्याय नव्हते. ई-कॉमर्स कंपन्यांना लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसला. अशात वेअरहाउस काही प्रमाणात त्यांना आधार देणारे ठरले.

हेही वाचा:

The post नाशिकमध्ये विस्तारतेय वेअरहाउसचे जाळे appeared first on पुढारी.