नाशिकमध्ये सत्तांतरानंतर भाजप आक्रमक, मतदारयाद्यांत फेरफार केल्याचा आरोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात सत्तांतर घडून येताच भाजपच्या नाशिक महानगर शिष्टमंडळाने प्रारूप मतदारयाद्यांसंदर्भात मनपा आयुक्तांची भेट घेत याद्यांमधील गोंधळाबाबत आक्रमक पवित्रा घेत जाब विचारला. प्रारूप मतदारयाद्यांमध्ये काही अधिकार्‍यांनी कुणाच्या तरी दबावाखाली येत मोठ्या प्रमाणावर फेरफार केल्याचा आरोप भाजप शिष्टमंडळाने केला. अधिकार्‍यांनी गांभीर्य ओळखून तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

पक्षाचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, जगन पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा हिमगौरी आडके, माजी सभागृहनेते दिनकर पाटील, उद्धव निमसे, अलका आहिरे, अ‍ॅड. श्याम बडोदे, भगवान दोंदे, माधुरी बोलकर, कुणाल वाघ, गोविंद घुगे, सुरेश पाटील, मंडल अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड, अविनाश पाटील, संतोष नेरे आदी उपस्थित होते. अनेक प्रभागांतील शेकडो नावे अन्य प्रभागांत समाविष्ट करण्यात आले आहेत. या सदोष याद्यांबाबत हरकती घेण्यासाठी दिलेली मुदत अल्प असून, प्रारूप याद्यांवर हरकती घेण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणीही भाजपने केली. विधानसभेतील प्रभागांची नावे खर तर त्या त्या प्रभागातील चतु:सीमेप्रमाणे पाहिजे. परंतु, अधिकार्‍यांनी कोणाच्या तरी दबावाखाली काम करून एकाच प्रभागातील नावे वेगवेगळ्या प्रभागांशी जोडल्याचा दावा भाजपने केला.

दुरुस्तीसाठी नागरिकांकडून आधारकार्ड, पॅनकार्डसाठी कागदपत्रे मागवून हेळसांड केली जात आहे. याबाबत अधिकार्‍यांना त्वरित कामाला लावावे, अशी सूचना शिष्टमंडळाने केली.

भाजपचा शिवसेनेकडे रोख
मतदारयाद्यांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करत भाजपने आपला रोख शिवसेनेकडे वळवला आहे. राज्यात सत्ताबदल होत नाही तोच भाजप पदाधिकारी आक्रमक झालेले पाहावयास मिळाले आहेत.

The post नाशिकमध्ये सत्तांतरानंतर भाजप आक्रमक, मतदारयाद्यांत फेरफार केल्याचा आरोप appeared first on पुढारी.