नाशिकमध्ये सोन्याला झळाळी

नाशिक : दसरा उलाढाल,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
साडेतीन मुहूर्तांमधील अर्धा अन् शुभ मुहूर्त मानल्या जात असलेल्या अक्षय तृतीयेला सोने-चांदी खरेदीतून मोठी उलाढाल झाली. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदी दराने विक्रमी नोंद केली. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या खरेदीवर परिणाम होण्याची भीती वर्तविली जात होती. मात्र, सोने 425 रुपयांनी स्वस्त झाल्याने व मुहूर्तावर खरेदीची प्रथा असल्याने सोन्याला झळाळी मिळाली.

अक्षय तृतीयेला सोने खरेदीकडे जास्त कल असतो. मात्र, सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाल्याने, त्याचा खरेदीवर परिणाम  होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी 425 रुपयांची किंचित घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. याचा परिणाम खरेदीवर झाल्याचे दिसून आले. सराफ व्यावसायिकांनी सांगितले की, मुहूर्तावर सोने खरेदीची प्रथा आहे. त्यामुळे दर वाढले किंवा कमी झाले याचा परिणाम खरेदीवर दिसून येत नाही. याशिवाय सराफ व्यावसायिकांनी ग्राहकांसाठी विविध योजना उपलब्ध करून दिल्यानेही खरेदीकडे ग्राहकांचा मोठा कल दिसून आला. घरपोच डिलिव्हरी, ऑनलाइन बुकिंग, मजुरीवर सूट, सोन्याच्या वजनात चांदी फ्री अशा अनेक योजना असल्याने ग्राहकांना सोने खरेदीचा आनंद घेता आला.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर चांदीलाही झळाळी बसल्याचे दिसून आले. चांदीचा भावदेखील 646 रुपयांनी घसरून 77 हजार 150 रुपये प्रतिकिलोवर होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीत गुंतवणूक म्हणून बघितले जात असल्याने खरेदीत उत्साह दिसून येत आहे. विशेषत: तरुण वर्गाकडून सोने-चांदी खरेदीत गुंतवणुकीला प्राधान्य दिले जात असल्याचे सराफ व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. दरम्यान, अक्षय तृतीयेला सोने-चांदीसह इलेक्ट्रिक वस्तू, घर, वाहन खरेदीही शुभ मानली जात असल्याने बाजाराला झळाळी मिळाली. गेल्यावर्षीच्या तुलनेत दहा हजाराची वाढ : मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोन्याच्या दरात दहा हजार रुपयांपेक्षा अधिक वाढ झाल्याचे दिसून आले. 62 हजारांपेक्षा अधिक दर असल्याने, सोने खरेदी करणे सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर असल्याचे दिसून आले. परंतु काही ग्राहकांकडून या मुहूर्तावर सोने खरेदीला प्राधान्य दिले जात असल्याने वाढत्या दराचा फारसा परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर आमरसाचा बेत असल्याने आंब्याच्या खरेदीसाठी ग्राहकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. यंदा ग्राहकांनी किरकोळ विक्रेत्यांपेक्षा थेट पेठ रोडवरील आरटीओ समोरील बाजार समितीत जाऊन आंबे खरेदी करण्यास प्राधान्य दिल्याने आंबा खरेदीतून मोठी उलाढाल झाली. यावेळी हापूस आंब्याचा दर दोनशे रुपयांपासून पुढे असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी शुभ मानले जात असल्याने, ग्राहकांकडून खरेदीला प्राधान्य दिलेच जाते. यंदा दर अधिक असल्याने खरेदीवर परिणाम होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला. चारशे रुपयांनी दर कमी झाले मात्र, तो प्रक्रियेचाच भाग आहे. – गिरीश नवसे, अध्यक्ष, सराफ असोसिएशन

हेही वाचा:

The post नाशिकमध्ये सोन्याला झळाळी appeared first on पुढारी.