नाशिकमध्ये हार्डवेअरच्या दुकानातून कोयत्यांची विक्री, १२ कोयते जप्त

हार्यवेअर दुकानात कोयत्याची विक्री,www.pudhari.news

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा

शहरात कोयता गँगने दहशत माजविण्यास सुरुवात केली असून, ठिकठिकाणी हातात फिल्मी स्टाइलने कोयते घेऊन दहशत करणे, एकमेकांवर वर्चस्व वादातून थेट कोयत्याने मारहाण करणे या घटनांनी शहर हादरले असतानाच अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संजीवनगर भागातील एका हार्डवेअरच्या दुकानातून पोलिसांनी १२ कोयते जप्त केल्याने हार्डवेअरच्या दुकानातून कोयत्यांची विक्री होत असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे.

या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित महेबूब मुझम्मिल खान याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील अनेक शहरांसह नाशिक शहरात कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. दिवसाढवळ्या हातात प्राणघातक कोयते घेऊन परस्पर विरोधी टोळीवर हल्ला करणे, सामान्य नागरिकांना लुटण्यासाठी कोयत्याचा वापर करणे, दहशत पसरविण्यासाठी हातात कोयते घेऊन धिंगाणा घालणे, दरोडा टाकण्यासाठी कोयत्याचा वापर करणे याचप्रमाणे अंबड पोलिस ठाण्यात झालेल्या एका हत्या प्रकरणातदेखील कोयत्याचा वापर झाल्याने शहरात बिनदिक्कतपणाने कोयते विकले जात असल्याचे दिसत होते. अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंबड लिंक रोडवरील संजीवनगर भागात एका दुकानातून कोयते विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना माहिती मिळाली. अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख व पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी संजीवनगर भागात धाड टाकली.

यात पोलिसांनी संशयित महेबूब मुझम्मिल खान (३९, रा. संजीवनगर) याच्या न्यू बबलू हार्डवेअर नावाच्या दुकानात पोलिसांनी छापा टाकून तीन हजार दोनशे रुपये किमतीचे १२ प्राणघातक कोयते जप्त केले आहे. या कारवाईमुळे थेट हार्डवेअरच्या दुकानातच प्राणघातक कोयते खुलेआम विकले जात असल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित महेबूब मुझम्मिल खान याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये हार्डवेअरच्या दुकानातून कोयत्यांची विक्री, १२ कोयते जप्त appeared first on पुढारी.