नाशिकमध्ये होणार 4 हजार किलो भगर बनविण्याचा जागतिक विक्रम

नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 निमित्त महाराष्ट्र मिलेट्स मिशन आणि नाशिक भगर मिल असोसिएशन यांच्या सहकार्याने विश्वविक्रम करणारे शेफ विष्णू मनोहर हे दि. १२ फेब्रुवारी रोजी पोलिस अकादमीसमाेरील पटांगणावर तब्ब्ल ४ हजार किलो भगर बनवणार आहेत. याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी नाशिक भगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र छोरिया, उमेश वैश्य, अशोक साखला, पारस साखला उपस्थित होते.

एकाच वेळी ४ हजार किलो भगर बनवून ती शहरात मोफत वाटण्यात येणार आहे. शेफ मनोहर यांनी आतापर्यंत विविध 15 रेकॉर्ड केले असून, नाशिकमधील हा त्यांचा १६ वा जागतिक रेकॉर्ड असणार आहे. आंतरराष्ट्रीय रेकॉर्डमधील तृणधान्य एकमेव रेकॉर्ड असून त्याची नोंद अनेक रेकॉर्ड्स बुक्समध्ये केली जाणार आहे. सकाळी ८ ला भगर बनवण्यास सुरुवात करून १०.३० पर्यंत भगर शिजवून तयार होईल. त्यानंतर ही भगर नागरिकांना, शहरातील अनाथालये, वृद्धाश्रम, रुग्णालय याठिकाणी मोफत वाटली जाणार आहे.

भगर बनवण्यासाठी खास कढई

४ हजार किलो भगर बनवण्यासाठी नागपूर येथे खास कढई तयार करण्यात आली आहे. कढईचे वजन दीड हजार किलो असून, १० बाय १० फूट व्यास आणि ५ फूट उंच आहे. त्यासाठी ३ प्रकारचे २२ किलो वजनाचे मोठे चमचेही तयार करण्यात आले आहेत.

अशी आहे रेसीपी ….

भगर ४०० किलो, बटाटा २५० किलो, मीठ ३७ किलो, तेल १२५ किलो, पाणी २७०० लिटर, जिरा १२ किलो, शेंगदाणे १०० किलो, शेंगदाणे कूट १२५ किलो, दही ४०० किलो, तूप १०० किलो, दूध १०० लिटर असे साहित्य वापरून भगर तयार केली जाणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये होणार 4 हजार किलो भगर बनविण्याचा जागतिक विक्रम appeared first on पुढारी.