नाशिकमध्ये २२ डिसेंबरपासून खान्देश महोत्सव, गायक शंकर महादेवन गाणार अहिराणी गाणे

शंकर महादेवन,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक शहरात गेल्या काही वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेल्या खान्देश महोत्सवात दिल्या जाणाऱ्या खान्देशरत्न पुरस्कारांची घोषणा महोत्सवाच्या संयोजिका आमदार सीमा हिरे, महेश हिरे, माजी नगरसेवक मुन्ना हिरे व महोत्सवाच्या संयोजिका रश्मी हिरे-बेंडाळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. यंदा खान्देशच्या अकरा सुपुत्रांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने जागतिक कीर्तीचे गायक शंकर महादेवन यांचा कार्यक्रम खास आकर्षण राहणार आहे.

नाशिक शहरात अनेक जण हे खान्देशातून स्थायिक झालेले आहेत. खान्देशमधील सर्वांना एकत्र करण्याबरोबरच खान्देशी संस्कृतीची माहिती सर्वांना व्हावी, या हेतूने गत काही वर्षांपासून खान्देश महोत्सव सुरू करण्यात आला आहे. यंदाही हा महोत्सव २२ ते २५ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या महोत्सवात खान्देशातून नाशिकमध्ये स्थायिक होऊन विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळविलेल्या ११ व्यक्तींना खान्देशरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

रविवारी (दि. २५) हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती रहाणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या सोहळ्याचे यंदाचे खास आकर्षण प्रसिद्ध गायक शंकर महादेवन हे राहणार आहेत. याशिवाय मराठी अभिनेते भारत गणेशपुरे, नृत्यांगना अभिनेत्री मानसी नाईक, अभिनेत्री हेमांगी कवी, चला हवा येऊ द्या फेम योगेश शिरसाठ, लावणी नृत्य कलाकार सुवर्णा काळे यासारख्या दिग्गज कलाकारांच्या मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहेत.

खान्देशरत्न पुरस्काराचे मानकरी

खान्देशरत्न पुरस्कारासाठी तळागळातून सर्वोच्च स्थान मिळविलेल्या विविध क्षेत्रांतील ११ मान्यवरांची निवड करण्यात आली असून, त्यात विशेष पुरस्कारासाठी गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सूर्यवंशी, १३१ वेळा रक्तदान करणारे पत्रकार दिलीप कोठावदे, संस्कृती नाशिक-पहाट पाडवाचे प्रणेते शाहू खैरे, आदर्श शिक्षिका कुंदा बच्छाव शिंदे, कामगार ते यशस्वी उद्योजक बुधाजी पानसरे, उद्योजक मनोज कोतकर, रणजी क्रिकेटपटू सत्यजित बच्छाव, अपंग संघटनेचे बाळासाहेब घुगे, निरुपणकार संजय धोंडगे महाराज, बहुभाषिक गायिका रायमा रज्जाक शेख (पिहू) व युनायटेड वुई स्टँड एनजीओ सागर मटाले यांचा समावेश आहे.

“अहिराणीत गाणे गाणार’

खान्देश महोत्सवाचे खास आकर्षण असलेल्या गायक शंकर महादेवन यांनी पत्रकारांशी लाइव्ह संवाद साधला. खूप वर्षांनी नाशिकला येऊन नाशिककरांचे मनोरंजन करण्याची संधी मला मिळते, याचा खूप आनंद होत असून खान्देश महोत्सवाच्या माध्यमातून नाशिककरांना संगीत संस्कृतीचा सर्वांगीण आनंद देण्यासाठी मी प्रयत्न करीन, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी महोत्सवात अहिराणी गाणे म्हणावे अशी सूचना पत्रकारांनी करताच महादेवन यांनी त्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करून अहिराणी भाषेतील गाणी गाणार असल्याचेही सांगत आपण नाशिकला येण्यासाठी आतुर असल्याचे सांगितले. 

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये २२ डिसेंबरपासून खान्देश महोत्सव, गायक शंकर महादेवन गाणार अहिराणी गाणे appeared first on पुढारी.