Site icon

नाशिकरोडला शिवसेनेला पुन्हा भगदाड पडण्याची शक्यता; दोघे शिंदे गटाच्या वाटेवर

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

येथील जेलरोड परीसरातील शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक शिवा तकाटे व त्यांचे शेकडो समर्थक तसेच प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक अजित बने समर्थकांसह बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. तसे झालेच तर नाशिकरोडच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला तिसऱ्यांदा मोठा हादरा बसून पुन्हा भगदाड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवा तकाटे हे शिवसेनेचे जेलरोड विभागप्रमुख आहेत. मागील अनेक वर्षापासून ते शिवसेनेसोबत एकनिष्ठ आहेत. त्यांच्या मातोश्रींनी महापालिकेची निवडणूक देखील लढवली असून थोड्या मताने त्यांचा पराभव झाला होता. आगामी महापालिका निवडणुकीत ते शिवसेनेकडून इच्छूक आहेत. पण सद्या शिवसेनेतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट अन् उद्धव ठाकरे गट अशा दोन शिवसेना झाल्या आहेत. त्यामुळे अनेक शिवसैनिक व्दिधा मनःस्थितीत असून नेमक्या कोणत्या शिवसेनेत आपल्याला राजकीदृष्ट्या भविष्य राहील असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. ताकाटे यांच्या समर्थकांनी त्यांना शिंदे गटाचा पर्याय दिला असून अगोदरच शिंदे गटात प्रवेश करणारे सूर्यकांत लवटे, चंद्रकांत लवटे हे देखील ताकाटे यांना शिंदे गटात खेचण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जाते आहे.

अजित बने समर्थकही तयार
जेलरोडचे प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक अजित बने लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात असून ते खासदार हेमंत गोडसे व शिंदे गटाचे शहराध्यक्ष बंटी तिदमे, बाबूराव आढाव यांच्या संपर्कात आहे. माजी नगरसेवक स्व. प्रकाश बोराडे यांचे ते नातेवाईक आहेत. सुशिक्षित व बांधकाम व्यावसायिक आहेत. त्याचप्रमाणे श्रीगणेश कला, क्रिडा व सांस्कृतिक महिला मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. शिव आराधना महीला मंडळ देखील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सक्रिय आहे. मागील अनेक वर्षांपासून ते विविध उपक्रम अन् कार्यक्रमामुळे परीसरात ओळखले जातात. त्यांच्या मागे तरुणवर्ग व महिला भगिनींचा मोठा वर्गाचा पाठींबा आहे.

हेही वाचा:

The post नाशिकरोडला शिवसेनेला पुन्हा भगदाड पडण्याची शक्यता; दोघे शिंदे गटाच्या वाटेवर appeared first on पुढारी.

Exit mobile version