Site icon

नाशिकरोड व्यापारी बॅंकेला ११ कोटींचा नफा, एनपीए शून्य टक्के

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

सहकार क्षेत्रात अग्रगणी असलेल्या दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बॅँकेस नुकत्याच संपलेल्या ३१ मार्च २०२३ या आर्थिक वर्षात ११ कोटींचा ढोबळ नफा झाला आहे. रिझर्व्ह बॅँकेने या बॅंकेला मोबाईल बॅंकींग सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे खातेदार, ग्राहकांना आरटीजीएस, नेफ्ट, फंड ट्रान्सफर, चेक बुक रिकवेस्ट, अकौंट स्टेटमेंट आदी बाबी काही सेकंदातच मोबाईलवर उपलब्ध होणार आहेत. खातेदारांनी बॅंकेचे मोबाईल ॲप संबंधित शाखेत जाऊन डाऊनलोड करून घ्यायचे आहे. याबाबतची माहिती बॅँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे आणि व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एनपीए शून्य टक्के राखण्यात बॅँकेला यश आले आहे. बॅंकेचे आजअखेर भांडवल १९.६९ कोटी आहे. ३१ मार्च २०२३ अखेर बॅँकेचा एकूण व्यवसाय ८७६.४९ कोटींवर असून गुंतवणूक ३०७.६६ कोटी आहे. बॅँकेच्या ठेवी ५५१.८८ कोटी असून बॅँकेने ३२४.६१ कोटींची कर्ज वाटप केली आहेत. सीडी रेशो ५८.८२ असून आज अखेर सभासद संख्या ७३,९२४ आहे. बॅँकेने मुदत ठेवीवरील व्याजदरात इतर बॅँकांच्या तुलनेत सर्वाधिक व्याजदर देऊ केला आहे. कर्ज घेऊ इच्छिणा-या सभासद व खातेदारांसाठी इतर बॅँकांच्या तुलनेत अत्यल्प दराने कर्ज उपलब्ध करून देत आहे.

अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे पुढे म्हणाले की, कोरोना काळामुळे सहकार क्षेत्रात निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थिती व अस्थिर वातावरणाचा ठेवी, कर्ज, नफा या सर्वांवर वाईट परिणाम झाला. सर्वच सहकारी बॅँका आणि पतसंस्थांवर त्याचा परिणाम झाला आहे. सामान्यांचा विश्वास पुन्हा संपादन करताना फार मोठे श्रम सहकार क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला करावे लागले. मात्र, कर्मचा-यांना नेहमीच दिशादर्शकाचे काम चोखपणे बजावणारे संचालक मंडळ या बॅँकेला लाभले आहे. अनुभव, विविधपक्षीय राजकारण व समाजकारण या त्रिसुत्रीने मार्ग काढत कोणतेही वाद उदभवू न देणारे संचालक मंडळ या बॅंकेला लाभले आहे. संचालक मंडळाने कर्मचारी वर्गाला नेहमीच पाठिंबा दिला असून विविध योजना राबवून त्यांची अमलबजावणी करण्याचे स्वातंत्र्य दिले. बॅँकेचा नेट एनपीए शून्य टक्के करण्याचा निर्धार केला. तो यशस्वी करण्यासाठी कर्मचा-यांना पाठिंबा दिला. संचालक मंडळाने कायम खातेदार, ग्राहकांचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी ग्राहक देवो भवो ही उक्ती सार्थ मानून दैनंदिन कामकाजाची सुरुवात नमन करून केली. असे करणारी ही कदाचित ही एकमेव बॅँक असावी. संचालक मंडळाने वेळोवेळी रिझर्व्ह बॅँकेच्या आदेशांचे पालन करत धोरणात्मक निर्णय घेतले. विविध योजना राबविल्या. बॅँकेच्या ठेवी व कर्ज वाटपाचे प्रमाण वाढीसाठींच्या प्रयत्नात सातत्य राखले. पत्रकार परिषदेत बँकेचे उपाध्यक्ष सुधाकर जाधव, जनसंपर्क संचालक जगन्नाथ आगळे, संचालक सुनील आडके, श्रीराम गायकवाड, मनोहर कोरडे, वसंत अरिंगळे, अशोक चोरडीया, सुनील चोपडा, डॉ. प्रशांत भुतडा, अरुण जाधव, रमेश धोंगडे, रामदास सदाफुले, संजय संचेती कर्मचारी प्रतिनिधी यशवंत पागेरे, मंगेश फडोळ, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम, महाव्यवस्थापक शरद वालझाडे, उपमहाव्यवस्थापक संजय वाघ, सहाय्यक महाव्यवस्थापक दिनेश नाथ, दिनकर आढाव आदी उपस्थित होते.

बॅँकेचा एनपीए शून्य…
एनपीए हा प्रत्येक बॅँकेच्या अंगावर काटा आणणारा मात्र अपरिहार्य असणारा मुद्दा आहे. बॅँकेने कर्जवाटपात दाखवलेली चिकित्सक वृत्ती व केलेली परिणामकारक वसुली यामुळे बॅँकेचा एनपीए शून्य टक्केच राहिला आहे. सातत्याने बॅँकेचा नेट एनपीए शून्य टक्के राहिला आहे. या बरोबरच हल्लाबोल मिशन, कर्मचारी वसुली खातेवाटप, नियोजन व आढावा, शाखाधिकारी मासिक सभा व त्यात पुढील मासिक लक्ष व अडचणींवर चर्चा आदी बाबी देखील अंतर्भूत करून बॅँकेला प्रगती नेण्यात व्यवस्थापनास यश मिळाले आहे. बॅँकेच्या प्रगतीच्या दृष्टीने कालानुरुप सुसंगत बदल केले. त्याचा परिपाक म्हणून तंत्रज्ञानाला कवेत घेऊन चालणारी ही बॅँक आहे. बॅँकेने वीज बील भरणा केंद्र, आरटीजीएस, सरकारी कर भरणा, कोअर बॅंकिंग, सोन कर्ज, एटीएम डेबीट कार्ड अशा प्रकारच्या सुविधा ही बॅँक सभासदांना उपलब्ध करून देत आहे. याव्दारे सर्वच तांत्रिक बाबींवर नियंत्रण मिळविण्यात बॅँक यशस्वी झाली आहे.

बॅँकेला एकूण २४ पुरस्कार प्राप्त…
संपूर्ण भारतात कोणत्याही एटीएममधून वापरता येणारी एटीएम सुविधा बँकेने ग्राहकांना उपलब्ध केली आहे. तंत्रज्ञान वापराकरीता बॅँकेला पूर्वीच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त बॅँकेला एकूण २४ पुरस्कार प्राप्त झाले असून त्यात उत्कृष्ट अहवालापासून ते उत्कृष्ट कामकाजापर्यंत अशा सर्वच पुरस्कारांचा समावेश आहे. संगणक तंत्रज्ञान व कार्ड सिस्टीम अनुषंगिक प्रणाली यामध्ये ही बॅँक अग्रगण्य आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तंत्रज्ञान विकासात आघाडीवर आहे. केवळ व्यवसाय हेच धोरण न बाळगता सामाजिक व सांस्कृतिक बांधिलकी यासाठी बॅंक कटीबध्द आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ३५ वर्षांपासून बॅँकेने सुरु ठेवलेला वसंत व्याख्यानमाला हा उपक्रम आहे. आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत, कोरोना काळात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना अल्पोहार व चहापान, वृक्षारोपण, गणेशोत्सव, आरोग्य शिबीरे, दत्तक शाळा, वाहतूक बेट आदी उपक्रम बॅंकेने जोपासून सामाजिक बांधिलकी जपली आहे. सर्वच स्तरावर व सर्वच क्षेत्रात बॅँक आघाडीवर आहे.

The post नाशिकरोड व्यापारी बॅंकेला ११ कोटींचा नफा, एनपीए शून्य टक्के appeared first on पुढारी.

Exit mobile version