नाशिकला शैक्षणिक हब बनविणार: पालकमंत्री दादा भुसे

collector edjucation www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करताना कृषी, आरोग्य, शिक्षण व रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार असून, नाशिकला शैक्षणिक हब करण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन बंदरे व खनिकर्ममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात शुक्रवारी (दि.३०) विविध शिक्षण संस्थांचे प्रमुख व शिक्षणतज्ज्ञांसमवेत संयुक्त आढावा बैठक पार पडली. त्याप्रसंगी भुसे बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जि. प.चे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मनपा व जिल्हा परिषद अधिकारी व शिक्षणसंस्थांचे प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री भुसे म्हणाले की, मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास जर साधायचा असेल तर येणाऱ्या पिढीला सक्षम शैक्षणिक मूलभूत सुविधा देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे व सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोयीचे होण्यासाठी प्रवासी वाहतुकीची सोय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना महामारीनंतर आरोग्यसेवेची गरज किती महत्त्वाची आहे, हे जाणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत नव्याने वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. जिल्ह्यात सेंट्रलाइज रिसर्च लॅब व्हावी यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विविध परीक्षा घेण्यात येतात. अशावेळी या परीक्षांसाठी जिल्ह्याला परीक्षा केंद्र व्हावे यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही भुसे यांनी दिली.

व्यावसायिक अभ्यासासाठी प्रयत्न : दिंडोरी तालुक्यात 2.50 हेक्टर जागा शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी राखीव ठेवण्यात आली असून, या जागेचा उपयोग शैक्षणिक हब करण्याच्या दृष्टीने करण्यात येईल. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची सुविधा उपलब्ध असावी यादृष्टीने विशेष प्रयत्न करण्यात येतील, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेण्यात येणार असून, शाळा व महाविद्यालयाच्या आवारात संरक्षणाच्या दृष्टीने पोलिस यंत्रणेचे सहकार्य घेतानाच सर्व शाळा व महाविद्यालयांत मुलींसाठी स्वच्छतागृहांच्या सुविधेला प्राधान्य असेल, असे भुसे यांनी स्पष्ट केले.

शिक्षणसंस्थांचे प्रश्न सोडविणार : शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करताना अनुदानित व विनाअनुदानित शिक्षणसंस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी भर देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री भुसे यांनी दिली. खा. गोडसे यांनी स्पेशल एज्युकेशन झोन म्हणून जिल्ह्याचा विकास केल्यास नाशिकला एक वेगळी ओळख मिळणार आहे. तसेच स्टार्टअपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होत असल्याने त्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा:

The post नाशिकला शैक्षणिक हब बनविणार: पालकमंत्री दादा भुसे appeared first on पुढारी.