नाशिकवर पाणी संकट ; गंगापूर धरणात 28 दिवस पुरेल एवढेच पाणी आरक्षण शिल्लक

गंगापूर धरण,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सर्वदूर पावसाचे प्रमाण चांगले असताना नाशिक शहर आणि धरणांच्या कॅचमेंट एरियामध्येच पावसाने ओढ दिली आहे. यामुळे नाशिक शहरापुढे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, गंगापूर धरणात केवळ 28 दिवस पुरेल इतकेच पाणी आरक्षण शिल्लक राहिले आहे. दरम्यान, पावसाने आणखी ओढ दिल्यास पाणीप्रश्न गंभीर होण्याची शक्यता ओळखून मनपा आयुक्त रमेश पवार सोमवारी (दि.11) आढावा घेणार आहे.

नाशिक शहराला गंगापूर धरण समूहास मुकणे आणि दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. दारणा धरणातून आरक्षित ठेवलेल्या पाण्याचा वापर गेल्या काही वर्षांपासून तर होतच नाही. यामुळे दारणातील आरक्षण आजमितीस तरी केवळ नावापुरतेच आहे. गंगापूर आणि मुकणे या दोन धरणांतून नाशिक शहरासाठी 5600 दशलक्ष घनफूट इतके आरक्षण ठेवण्यात आले असून, त्यापैकी गंगापूर धरण समूहातून 4200, तर मुकणे धरणातून 1400 दशलक्ष घनफूट इतके आरक्षण आहे. 4 जुलै 2022 पर्यंत 5002.03 दशलक्ष घनफूट इतक्या पाण्याचा वापर झाला आहे. सध्या गंगापूर धरणात 400.53, तर मुकणे धरणात 197.44 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण शिल्लक आहे. गंगापूर धरणातून शहराला दररोज 14.53 दशलक्ष घनफूट पाणी वितरण केले जाते. यामुळे शिल्लक आरक्षण आणि दररोज लागणारे पाणी या हिशोबाने गंगापूर धरणात केवळ 28 दिवस पुरेल इतकेच आरक्षण शिल्लक राहिले असून, मुकणे धरणातून शहराला दररोज 4.47 दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा केला जातो. त्या अनुषंगाने 43 दिवस पुरेल इतकेच आरक्षण मुकणे धरणात शिल्लक आहे.

पाणीकपातीचा निर्णय शक्य
शिल्लक राहिलेले आरक्षण आणि पावसाकडून मिळणारी हुलकावणी पाहता नाशिक शहरासाठी पाणीपुरवठ्याचा प्रश्न येत्या काळात गंभीर बनू शकतो. आणखी काही दिवस त्र्यंबक आणि इगतपुरी धरण परिसरात पावसाने हजेरी लावली नाही तर नाशिक शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याची वेळ येऊ शकते. आणि त्या द़ृष्टीनेच सोमवारी (दि.11) मनपा आयुक्त रमेश पवार हे पाणीपुरवठा तथा सार्वजनिक अभियांत्रिकी विभागाचा आढावा घेऊन ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

The post नाशिकवर पाणी संकट ; गंगापूर धरणात 28 दिवस पुरेल एवढेच पाणी आरक्षण शिल्लक appeared first on पुढारी.