नाशिकसाठी तीनशे कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता

पाणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील जुन्या जलवाहिन्या बदलणे व त्यांची क्षमता वाढवणे यासाठी महापालिकेने अमृत दोन योजनेंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवलेल्या ३०० कोटींच्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. प्राधिकरणकडून अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. तांत्रिक मान्यतेमुळे एक प्रकारे या योजनेला ग्रीन सिग्नल मिळाला असून, त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेतील गळती रोखण्यासह पाणीपुरवठ्याच्या क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.

मनपाने केलेल्या वॉटर ऑडिटमध्ये शहरात २० टक्के पाण्याची गळती होत असल्याचे समोर आले होते. सद्यस्थितीत शहरातील जलवाहिन्या ३० वर्षांपूर्वी टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे पाणीगळतीसह ठिकठिकाणी त्यात बिघाड पाहायला मिळत आहे. त्यामुळे महापालिकेने अमृत – १ योजनेंतर्गत जलवाहिन्या बदलण्यासाठी व पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी निधीची मागणी केली होती. मात्र, काही कारणास्तव हा प्रस्ताव नामंजूर झाला होता. अमृत – २ योजनेंतर्गत मनपाने पुन्हा नव्याने ३०० कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. त्यास मंजुरी मिळाल्याने तांत्रिक मान्यतेसाठी हा प्रस्ताव मागील दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवला होता. त्यास तांत्रिक मान्यता देण्यात आली असून, अंतिम मंजुरीसाठी तो राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तांत्रिक मान्यतेमुळे या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाले असून, पुढील १५ दिवसांत अंतिम मंजुरी मिळेल. या योजनेंतर्गत शहरातील ३० वर्षे जुन्या जलवाहिन्या बदलण्यासह नव्या वस्त्यांमध्ये नवीन जलवाहिन्या टाकणे, जलकुंभांची संख्या वाढवणे, जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढवली जाणार आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होणार असून, आगामी सिंहस्थाच्या अगोदर सर्व कामे पूर्ण केली जाणार आहे.

अमृत योजनेंतर्गत ३०० कोटींच्या प्रस्तावाला महाराष्ट्र प्राधिकरणने तांत्रिक मान्यता दिली आहे. राज्य शासनाकडून पुढील १५ दिवसांत अंतिम मंजुरी मिळेल. या योजनेंतर्गत शहरातील जुन्या जलवाहिन्या बदलून नव्या टाकल्या जातील.

– शिवाजी चव्हाणके, अधीक्षक अभियंता, मनपा

– तीनशे किलोमीटरच्या नव्या जलवाहिन्या टाकणार

– सहा इंचीच्या नव्या जलवाहिन्या

– पाणीगळती थांबणार

– सन २०५५ पर्यंत ५५ लाख लोकसंख्येला पाणीपुरवठ्याचे नियोजन

– डिसेंबर २०२५ पर्यंत योजना पूर्ण करण्याचे आव्हान

– केंद्र व राज्याच्या एकूण निधीच्या पन्नास टक्के खर्च महापालिका उचलणार

हेही वाचा : 

The post नाशिकसाठी तीनशे कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता appeared first on पुढारी.