नाशिक : अंजनेरीला बंधाऱ्यात बुडालेल्या मामा-भाचा यांचे मृतदेह सापडले

मृतदेह

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा

अंजनेरी शिवारात रविवारी (दि. 30) सुटीच्या मजेनिमित्त फिरण्यास आलेले आणि बंधाऱ्यात पोहताना बुडालेल्या मामा-भाच्यापैकी बेपत्ता असलेल्या भाच्याचा मृतदेह सोमवारी (दि. 1) सापडला. या दुर्घटनेत या दोघांचा मृत्यू झाला.

प्रसाद बाबासाहेब झगरे (२२), वैभव वाल्मीक वाकचौरे (1४) आणि प्रतीक वाकचौरे हे तिघे दुचाकीवर अंजनेरी परिसरात रविवारी दुपारी फिरण्यास आले होते. दुपारी ते मुळेगाव बारीच्या बाजूस असलेल्या प्रतिकेदारनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतताना तिघे बंधाऱ्यात पोहण्यासाठी उतरले होते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही गटांगळ्या खाऊ लागले. तिघांनी आणि बंधाऱ्याच्या काठावर उपस्थित असलेल्या पर्यटकांनी आरडाओरडा करताच काही ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. त्यांनी काठावर असलेल्या प्रतीकला पाण्यातून बाहेर ओढल्यामुळे तो बचावला. मात्र तोपर्यंत प्रसाद झगरे आणि वैभव वाकचौरे हे दोघे बुडाले. सायंकाळ होत आल्याने बचाव कार्यासाठी शिंगाडा तलाव येथून रबरी बोट घेऊन अग्निशमन बंबासह जवान तसेच त्र्यंबकेश्वर पोलिस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत अंजनेरी गावातील युवकांनी शोधमोहीम राबविली असता, सायंकाळी 6.30 च्या सुमारास प्रसाद झगरे याचा मृतदेह पथकाच्या हाती लागला. अंधार वाढल्याने रविवारी शोधमोहीम थांबविण्यात आली होती. सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्यास सुरुवात करताच वैभव वाकचौरेचा मृतदेह सापडला. प्रसाद झगरे आणि वैभव वाकचौरे हे दोघे मामा-भाचे होते. प्रसाद हा छत्रपती संभाजीनगर येथून सुटीनिमित्त नाशिकला आला होता. दरम्यान त्र्यंबक पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : अंजनेरीला बंधाऱ्यात बुडालेल्या मामा-भाचा यांचे मृतदेह सापडले appeared first on पुढारी.