नाशिक : अंबडला सराईत गुन्हेगाराचा खून

अक्षय उत्तम जाधव www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
अंबड गाव परिसरातील महालक्ष्मीनगर येथे किरकोळ कारणातून झालेल्या भांडणांमध्ये सराईत गुन्हेगारावर धारदार शस्त्राने वार करून त्याच्या खुनाची घटना घडली. अंबड पोलिसांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन संशयितांना अर्ध्या तासात सापळा रचून अटक केली. या मृत गुन्हेगाराचे नाव अक्षय उत्तम जाधव (वय 26) असे आहे.

याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे की, शुक्रवारी (दि. 28) रात्री 9.30च्या सुमारास तन्मय गोसावी (वय 21) आणि आकाश साळुंखे (वय 21) हे महालक्ष्मीनगरात प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर बसलेले असताना, अक्षय हा साथीदारांसह त्या ठिकाणी आला होता. त्यावेळी त्यांचे वाद होताच तन्मय गोसावीने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने अक्षयच्या डोक्यात वार केला. स्वतःला वाचविण्यासाठी अक्षय समोर असलेल्या घराच्या एका बाल्कनीत पळाला. गोसावी आणि साळुंखे हे त्याच्या मागे पळाले व त्याला पकडले आणि पुन्हा अक्षयच्या डोक्यात कोयत्याने वार करून जबर जखमी केले. नंतर त्याच्या डोक्यात दगड घातला. या ठिकाणी असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने अक्षयला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयित मारतील, या भीतीने तोही पळून गेला. दरम्यान त्याने अंबड पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती दिली असता, अंबड पोलिस ठाण्याचे पथक रात्री तत्काळ पोहोचले. त्यांनी जखमी अक्षयला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी अक्षयला तपासून त्यास मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपआयुक्त विजय खरात, सहायक आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक किशोर कोल्हे, उपनिरीक्षक संदीप पवार आदींसह गुन्हे शोध पथक व पोलिस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर पोलिस पथकाने संशयित मारेकरी तन्मय व आकाश हे फरार होण्याच्या तयारीत असताना अर्ध्या तासात सापळा रचून तत्काळ अटक केली. या प्रकरणी मृताचा मोठा भाऊ आशुतोष जाधवने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित तन्मय गोसावी व आकाश साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : अंबडला सराईत गुन्हेगाराचा खून appeared first on पुढारी.