नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीत बंदुकीचा धाक दाखवत मोबाईलची चोरी

मोबाईल चोरी

सिडको; पुढारी वृत्तसेवा : अंबड औद्योगिक वसाहतीत पोलीस चौकीच्या हद्दीत सोमवारी (दि. २४) सायंकाळी कारमधून आलेल्या चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत सहा ते सात ठिकाणी मोबाईल लंपास केल्याची घटना घडली. या घटनेने उद्योजक, कामगार व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरली होती .

काही दिवसांपूर्वीच अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर येथील गुन्हेगारी कमी होईल अशी अपेक्षा असताना थेट बंदुकीचा धाक दाखवून सहा ते सात मोबाईल चोरीच्या घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोमवारी सायंकाळी औद्योगिक वसाहतीत विविध ठिकाणी काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत सहा ते सात जणांचे मोबाईल लांबवले. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या घटनेनंतर काही उद्योजकांनी पोलीस चौकीवर धाव घेत तात्काळ कारवाईची मागणी केली. या प्रकरणी अंबड पोलीस चौकी व अंबड पोलीस ठाणे येथे रात्री उशिरा पर्यत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते . पुढील तपास औद्योगिक वसाहत चौकीचे पोलिस निरीक्षक राजु पाचोरकर करत आहेत.

अंबड औद्योगिक वसाहतीतमध्ये चारचाकीने आलेल्या दोन युवकांनी चहाच्या टपरी जवळून पायी जाणाऱ्या युवकाचा मोबाईल हिसकावुन नेला. या युवकाने चारचाकी व दुचाकीवरुन पाठलाग केला. त्याने चारचाकीच्या काचेवर दगड मारून काच फोडली या नंतर लुटारुंनी कार थांबवुन बंदुक दाखविल्यानंतर सदर युवक घाबरला.

अंबड औद्योगिक वसाहतीत पोलीस गस्त वाढविली पाहीजे तसेच पोलीस चौकीसाठी कर्मचारी वाढविले पाहीजे अशा घटना घडल्यास रात्री कामगार कंपनीत येणार नाही
-धनंजय बेळे,अध्यक्ष निमा

तीन ठिकाणी मोबाईल चोरीचे प्रकार घडले आहे . सीसी टिव्ही फुटेज मिळाले आहे . गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे . आरोपी कडे बंदुक असल्याचे निष्पन्न होत नाही तरी तपास सुरु आहे . आरोपी लवकर अटक करणार व कार चा तपास लागण्याची शक्यता आहे
-राजू पाचोरकर, पोलिस निरीक्षक औद्योगिक पोलिस चौकी

The post नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीत बंदुकीचा धाक दाखवत मोबाईलची चोरी appeared first on पुढारी.