नाशिक : अक्कलकुव्याच्या बेपत्ता मुली मनमाडमध्ये सापडल्या

missing

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा
अक्कलकुवा येथील एका विद्यालयातील विद्यार्थिनी नाशिक जिल्ह्यातील खेडेगाव येथून कब्बडी स्पर्धा खेळून परत येत असतांना पिंपळनेर बसस्थानक येथून हरविल्या.  ही घटना शनिवारी दुपारी घडली. पिंपळनेर पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यात आल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे आणि पोलीस उपनिरीक्षक भाईदास मालचे यांनी तपासाची चक्रे फिरविली असता या मुली मनमाड रेल्वे पोलिसांना मिळून आल्या.

मुलींना पथकाने पहाटेच्या सुमारास पिंपळनेर पोलीस ठाण्यात आणले व शिक्षिकांकडे सुपुर्द केले. नाशिक जिल्ह्यातील खेडेगाव येथील या स्पर्धेत ३ शिक्षकासह २८ विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धा आटोपून अक्कलकुवा येथे परतीसाठी महामंडळाच्या एमएच २० बीएल ४२४७ या क्रमांकाच्या वडाळीभोई नंदुरबार या बसने ते सर्व निघाले. पिंपळनेर येथे बस थांबली. बसमधून दोन मुली व शिक्षिका लघुशंकेसाठी खाली उतरल्या मात्र, बसमध्ये बसले असता दोन मुली कमी होत्या. या दोन मुलींना बसस्थानक परिसरात शोधण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेराही तपासण्यात आला. सटाणा रस्त्यावर तसेच गावात बाजारपेठेत व इतर ठिकाणी शोध घेण्यात आला. दिवसभर त्या कुठेच आढळून आल्या नाहीत.

पोलीसांच्या मदतीने शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत. याप्रकरणी हरविल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी पोलीस ठाण्यात थांबून होते. त्या मुलींचे फोटो पोलीस अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर पाठविले. जवळपासच्या सर्वच पोलीस ठाण्यांशी संपर्क साधला. अखेरीस रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला असता मनमाड रेल्वे पोलिसांना दोन मुली आढळून आल्या असल्याची माहिती मिळाली. मुलींची चौकशी केली असता त्या मुली त्याच असल्याची खात्री झाल्याने सहायक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी पोलिसांचे पथक पाठवून त्या मुलींना पहाटे पिंपळनेर पोलिस ठाण्यात आणले आणि शिक्षकांकडे सुपुर्द केले.

हेही वाचा :

The post नाशिक : अक्कलकुव्याच्या बेपत्ता मुली मनमाडमध्ये सापडल्या appeared first on पुढारी.