नाशिक : अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर होणार श्री भगवती मंदिर सभामंडप जिर्णोद्धार समारंभ

नाशिक, पुढारी वृत्तसेवा :  लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील शक्तीपीठापैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ सप्तशृंगगड हे नाशिक पासून ६५ कि.मी. अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पूर्व पश्चिम पर्वत रांगेत डोंगर पठारावर समुद्र सपाटीपासून सुमारे ४६०० फुट उंचीवर असून, या ठिकाणी वर्षभरात सुमारे ४० ते ४५ लाख भाविक श्री भगवतीच्या दर्शनासाठी येत असतात.

विश्वस्त संस्थेने भाविकांच्या सेवा-सुविधा अंतर्गत दर्शन व्यवस्थेसह अल्पदरात निवास व्यवस्था तसेच ना नफा ना तोटा या तत्वावर अल्प दरात प्रसादालय भोजन व्यवस्था कार्यान्वित केली असून, विश्वस्त मंडळा मार्फत नव्यानेच श्री भगवती मंदिर जिर्णोद्धाराचे काम व श्री भगवती मंदिर गाभारा चांदीचे नक्षीकांत काम हाती घेण्यात आले असून श्री भगवती मंदिर सभामंडपाच्या प्रकल्पाच्या पुर्ततेसाठी मोठ्या प्रमाणात देणगी व निधी आवश्यक असून त्यासाठी भाविकांनी यथाशक्ती मदत करावी असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे तसेच गाभारा चांदीचे नक्षीकांत कामासाठी मोठ्या प्रमाणात चांदी अपेक्षित असून त्यात भाविक स्व:ईच्छेने योगदान देत आहेत. वर्षभरातील चैत्र व नवरात्र उत्सव पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार व रविवार इत्यादी दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी असते. सदर गर्दीचे नियोजन व नियंत्रण होणेकामी मा. अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने श्री भगवती मंदिराचा सभामंडप विस्तार व सुशोभीकरण करण्याचे योजिले असून त्यासाठी किमान रू. ७ कोटी खर्च अपेक्षित आहे.

श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट ने सन १९८१ मध्ये श्री भगवती मंदिर सभामंडपाचे बांधकाम केले होते. मात्र ४२ वर्षांनंतर बांधकामातील नवीन तंत्रज्ञान तसेच संगणक प्रणालीवर आधारित अद्ययावत सेवा सुविधा कार्यान्वित करण्याचे दृष्टीने व त्यात भाविकांची वाढती संख्या, दर्शन नियोजन, अंतर्गत विद्युतीकरण, सी सी टी वी प्रणाली, दर्शनी भागाचे सुशोभीकरण करणे हेतूने विद्यमान अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने मंदिर जीर्णोद्धार करण्याचे नियोजित केले आहे. सदर श्री भगवती मंदिर जिर्णोद्धार कार्यारंभ सोहळा साडेतीन मुहूर्ता पैकी एक अक्षय्य तृतीया दि. २२/०४/२३ रोजी दुपारी १.०० वाजता या शुभमुहूर्तावर मा. नामदार सौ. भारतीताई प्रविण पवार – केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री, भारत सरकार, दिल्ली यांचे शुभ हस्ते तसेच मा. नामदार दादाजी भुसे – बंदरे व खनिकर्म मंत्री तथा पालक मंत्री नाशिक जिल्हा यांचे अध्यक्षते खाली करण्याचे नियोजित असून, याप्रसंगी आमदार श्री नितीन पवार, जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांचे प्रमुख उपस्थित संपन्न होत आहे. अशी माहिती विश्वस्त संस्थे मार्फत प्रसार माध्यमांना देण्यात येत आहे.

The post नाशिक : अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर होणार श्री भगवती मंदिर सभामंडप जिर्णोद्धार समारंभ appeared first on पुढारी.