नाशिक: अखेर रेस्कू मोहिमेतून २२ पर्यटक सुखरूप; एक वाहून गेला

dugarwadi www.pudhari.news

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबक तालुक्यात रविवारी दि.७ संध्याकाळनंतर अतिवृष्टी झाल्याने दुगारवाडी धबधब्याच्या पलीकडच्या बाजूला पंधरा ते वीस जण अडकले होते. त्यातील पाच स्थानिक पर्यटक जंगलातून रस्ता काढत घरी परत आले. त्यांनी येथे अडकलेल्या लोकांबद्दल स्थानिकांना माहिती दिली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन तातडीने राबविण्यात आल्याने नाशिकमधील काही तज्ज्ञ त्वरीत मदतीला रवाना झाल्याने मध्यरात्री १.३७  वाजता वनविभाग आणि त्र्यंबक तहसीलदार व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समुहाने रेस्कू पूर्ण करत सगळ्या २२ पर्यटकांना सुखरूप बाहेर काढत मोहीम फत्ते केली आहे. मात्र, यामध्ये एकजण वाहून गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

रविवार म्हणजे सुट्टीची पर्वणी अशा सुट्टीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर परिसरातील निसर्ग सौंदर्य अनुभवण्यास गेलेले २३ तरुणांना मात्र दुगारवाडी धबधबा परिसर न्याहळतांना जिवावर बेतले. संध्याकाळनंतर पावसाचा जोर वाढल्याने दि.७ मध्यरात्री ही तरुणाई परिसरातील धबधब्याजवळच अडकली. त्यातील काही जणांनी हिंमतीचे पाऊल उचलत स्वत:चा बचाव केला. त्यानंतर त्यांनी गावात पाेहचून इतर जण अडकल्याची माहिती दिल्याने त्वरीत रेस्कू मोहिम सुरू करण्यात आली. या बचाव मोहीम राबवत २२ तरुणांना वाचविण्यात यश आले. एक जण वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये स्थानिक ग्रामस्थांसह रेस्क्यू असोसिएशन, वन विभाग, महसूल व पोलीस प्रशासन यांच्या अथक प्रयत्नांना यश आल्याने पर्यटक सुखरूप घरी जाऊ शकले.  अविनाश गरड (रा.आंबेजोगाई, जि. बीड) असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या मोहिमेसाठी अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, तेजस चव्हाण नाशिक ग्रामीण, दीपक गिरासे उपविभागीय पोलिस अधिकारी आदींच्या पथकाचे सहकार्य लाभले.

हेही वाचा:

The post नाशिक: अखेर रेस्कू मोहिमेतून २२ पर्यटक सुखरूप; एक वाहून गेला appeared first on पुढारी.