नाशिक : अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या सिन्नरला शेतकरी मेळावा

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार येत्या गुरुवारी (दि. 30) सिन्नर तालुक्याच्या दौर्‍यावर येत आहेत. शहा येथे ना. पवार यांच्या उपस्थितीत दुपारी 3 वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सिन्नरच्या पूर्व भागातील वीज समस्येवर रामबाण उपाय ठरलेल्या 132 केव्हीए क्षमतेच्या वीज केंद्राच्या लोकार्पणाचे निमित्त साधून आमदार माणिकराव कोकाटे यांनी हा शेतकरी मेळावा आयोजित केला आहे.

अजित पवार यांच्या सोबतच विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, आमदार धनंजय मुंडे, आमदार दिलीप बनकर, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील बडे नेते शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या गेलेल्या सिन्नर तालुक्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या दौर्‍याच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीकडूनही शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला वीजप्रश्न निकाली काढण्यासाठी आमदार कोकाटे यांच्या प्रयत्नातून शहा येथील 132 केव्हीए क्षमतेचे वीज केंद्र मार्गी लागले आहे. जानेवारीत हे वीज केंद्र बाबळेश्वर येथून पावर ग्रीडच्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात आले असून वडांगळी, सोमठाणे व देवपूर या उपकेंद्रांना वीज पूरवठा करण्यात येत आहे. या विजय केंद्रातून वावी व पाथरे या सिन्नर तालुक्यातील उपकेंद्रांना वीजपुरवठा करण्याचे नियोजन असून शेजारच्या कोपरगाव तालुक्यातील चार उपकेंद्रांना देखील वीजपुरवठा केला जाणार आहे. आमदार कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जि. प. सदस्य सीमंतिनी कोकाटे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ आदींसह पदाधिकारी या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या सिन्नरला शेतकरी मेळावा appeared first on पुढारी.