Site icon

नाशिक : अतिवृष्टीबाधितांना मिळणार 37 कोटींची मदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये जून-ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे 19 हजार 216 हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. तब्बल 56 हजार 675 शेतकरी बाधित झाले असून, शासनाने बाधितांच्या मदतीसाठी 36 कोटी 95 लाख 68 हजार रुपयांचे अनुदान दिले आहे.

अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांची मोठी हानी झाली असून, काही ठिकाणी शेतीजमीन खरवडल्याने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व नगर जिल्ह्यांना पावसाने तडाखा दिला. अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकर्‍यांना वाढीव मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानुसार शनिवारी (दि. 10) राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाच्या निधीतून 3 हजार 501 कोटींचा निधी बाधित शेतकर्‍यांच्या मदतीसाठी जिल्ह्यांना वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. वाढीव मदतीप्रमाणे जिरायतीसाठी 13,600 रुपये प्रतिहेक्टर, बागायत पिकांसाठी 27 हजार आणि बहुवार्षिक पिकांसाठी 36 हजार रुपये प्रतिहेक्टर मदत दिली जाणार असून, तीन हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्यात येणार आहे. विभागातील पाचही जिल्ह्यांसाठी शासनाने 36 कोटी 95 लाख 68 हजार रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले आहे. त्यामध्ये जळगाव जिल्ह्यासाठी सर्वाधिक 19 कोटी 6 लाख 4 हजार रुपयांच्या निधीचा समावेश आहे. तर नाशिकसाठी 11 कोटी 24 लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले.

हेही वाचा:

The post नाशिक : अतिवृष्टीबाधितांना मिळणार 37 कोटींची मदत appeared first on पुढारी.

Exit mobile version