नाशिक : अनधिकृत शाळा व्यवस्थापना विरोधात गुन्हा

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारच्या शिक्षण विभागाची मान्यता न घेताच अनधिकृतपणे शाळा चालवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेलरोड भागातील तिरुपती एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट, नाशिक संचलित एमराल्ड हाईट्स पब्लिक स्कूल या शाळेच्या व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल असून महापालिका शिक्षण मंडळाचे प्रभारी केंद्रप्रमुख गोपाल बैरागी यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

राज्यातील अनधिकृत शाळा बंद करण्याचे राज्याच्या शिक्षण विभागाचे आदेश होते. त्यानुसार नाशिकरोड भागातील एमराल्ड हाईट्स पब्लिक स्कूल ही इंग्रजी माध्यमाची आणि सीबीएससी बोर्डाचा अभ्यासक्रम असलेली शाळा विना परवानगी सुरू असल्याचे पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या चौकशीत उघड झाले होते. त्यामुळे शाळा बंद करण्याचे आदेश महापालिकेच्या शिक्षण मंडळातर्फे देण्यात आले होते. मात्र तरीही ही शाळा सुरूच असल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे शिक्षण मंडळाने शाळा प्रशासनाला आर्थिक दंड ठोठावला होता. तरीदेखील एमराल्ड हाईट्स पब्लिक स्कूल शाळा व्यवस्थापनाने पालिका शिक्षण विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली होती. वारंवार सूचना देवूनही शाळा सुरूच राहिल्याने अखेर शिक्षण विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा;

The post नाशिक : अनधिकृत शाळा व्यवस्थापना विरोधात गुन्हा appeared first on पुढारी.