नाशिक : अनधिकृत हाेर्डिंग्ज हटविण्यास १४ डिसेंबरचा अल्टिमेटम

होर्डींग www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या विविध कर विभागाने महसूलवाढीच्या दृष्टीने शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या अनधिकृत होर्डिंगविरोधात पावले उचलली असून, १४ डिसेंबरनंतर शहरात अनधिकृत हाेर्डिंग्ज आढळून आल्यास संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारा नोटीसद्वारे दिला आहे. हाेर्डिंग्ज, बॅनर, फलक उभारणाऱ्यांनी ते स्वत: काढून घ्यावे, अन्यथा जप्त करण्याचा इशाराही मनपाच्या उपआयुक्त अर्चना तांबे यांनी दिला आहे.

शहरासह परिसराचे विद्रुपीकरण थांबावे आणि शहर स्वच्छ व सुंदर रहावे, यासाठी न्यायालयाने तसेच शासनाने अनधिकृत हाेर्डिंग्जला चाप लावलेला आहे. तरीही शहरभर अनेक ठिकाणी हाेर्डिंग्ज, बॅनर, फलक उभारण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरूच आहेत. यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर न्यायालयाने अनधिकृत हाेर्डिंग्ज हटवणे व लावणाऱ्यांविराेधात फाैजदारी कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून त्याचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे दिसून येते. त्यासंदर्भात साताऱ्याच्या सुस्वराज फाउंडेशनतर्फे मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. नाशिकमधूनही सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांनी अनधिकृत होर्डिंग्जसंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने ३१ जानेवारी २०१७ रोजी अनधिकृत होर्डिंग्ज, फलकांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश राज्य शासन तसेच महापालिकांना देण्यात आले आहेत. अनधिकृत होर्डिंग्जविरोधात कारवाईसाठी न्यायालयाने १८००२३३३४७१ व १८००२३३१९८२ हे दोन टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले होते. याशिवाय ७७६८००२४२४ या भ्रमणध्वनी क्रमांकावर व्हॉटस्अपद्वारे तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

महापालिकेचा ऑक्टोबरअखेर ४०० कोटींची तूट भरून काढण्यासाठी मनपाकडून प्रयत्न केले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून अनधिकृत हाेर्डिंग्जमुळे बुडणारा महसूल मिळावा यासाठी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्यानुसार शहरात मनपा व खासगी जागेत हाेर्डिंग्ज लावण्याची ठिकाणे तसेच त्याचे शुल्क जाहीर करण्यात आले असून, परवानगी न घेताच उभारल्या जाणाऱ्या हाेर्डिंग्जधारकांवर दंडात्मक कारवाईसह फौजदारी दाखल करण्यात येणार आहे.

अधिकृत फलकावर असेल क्यूआर कोड

होर्डिंग, फलक उभारण्यासंदर्भात मनपाने जारी केलेल्या नोटीसमध्ये अनेक तरतुदी देण्यात आल्या आहेत. फलक लावायचा असल्यास १० बाय १० जागा निश्चित केलेल्या ठिकाणांची यादी मनपाने www.nmc..gov.in या संकेतस्थळावर जाहीर केलेली आहे. मनपाने निश्चित केलेल्या जागांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी हाेर्डिंग्ज लावायचे असल्यास संबंधित विभागीय कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रांत अधिकृत अर्ज दाखल करून परवाना घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.

महापालिका तसेच मान्यता दिलेल्या खासगी ठिकाणी लावलेले अनधिकृत हाेर्डिंग्ज, बॅनर व फलक हटविण्यास १४ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत संबंधितांनी आपापले होर्डिंग काढून घ्यावे. अन्यथा होर्डिंग जप्त करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच गुन्हा दाखल केले जातील. मनपाकडून होर्डिंग जप्त झाल्यास त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल.

– डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त

हेही वाचा :

The post नाशिक : अनधिकृत हाेर्डिंग्ज हटविण्यास १४ डिसेंबरचा अल्टिमेटम appeared first on पुढारी.