नाशिक : अनधिकृत होर्डिंगविरोधातील मोहीमेला पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांकडून खो

नाशिक मनपा, होर्डिग मोहीम www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहर विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत होर्डिंग तसेच फलक हटविण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गुरूवारपासून (दि.१५) माेहीम राबविण्याचे आदेश दिले होते. परंतु, विभागीय अधिकारी आणि अतिक्रमण निर्मुलन विभागाने आयुक्तांच्या आदेशांना मोहीमेच्या पहिल्याच दिवशी खो दिला. याबाबत संबंधित विभाग तसेच विभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता एकाही अधिकाऱ्याला आपल्या विभागात काय कारवाई झाली याचा पत्ताच नव्हता.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच वाढदिवस आणि इतरही कार्यक्रमाच्या निमित्ताने सध्या शहर परिसरात चौकांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी होर्डिंग उभारण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणावर होर्डिंग्ज, बॅनर, शुभेच्छा फलक लावण्यात आल्याने शहर विद्रुपीकरणात भर पडली आहे. राज्य सरकारविरोधात सुस्वराज फाउंडेशनतर्फे दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने ३१ जानेवारी २०१७ रोजी अंतिम आदेश देत अनधिकृत होर्डिंग्ज, फलकांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश राज्य शासन तसेच महापालिकांना दिले होते. परंतु, आजमितीस न्यायालयाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी मनपाकडून होत नसल्याचे चित्र आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्याने तसेच महापालिकेचा महसूलही बुडत असल्याने मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अतिक्रमण विभागाला अनधिकृत फलक हटविण्याचे आदेश दिले आहेत. तत्पूर्वी आयुक्तांनी १४ डिसेंबरपर्यंत शहरातील अनधिकृत होर्डिंग, फलक, बॅनर उभारणाऱ्यांना स्वत:हून होर्डिंग हटविण्यासाठी मुदत दिली होती. परंतु, या कालावधीत किती होर्डिंग बहाद्दरांनी फलक हटविले आणि मोहीमेच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुरूवारी (दि.१५) शहरातून किती अनधिकृत होर्डिंग, बॅनर, फलक हटविले याची माहिती अतिक्रमण विभागाला नव्हती आणि विभागीय अधिकाऱ्यांनीही त्याबाबत अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे अंगुलीनिर्देश केले.

आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली

मोहीमेसंदर्भात पश्चिम व पंचवटी विभागाचे अधिकारी मदत हरिश्चंद्र, सिडको आणि सातपूरचे विभागीय अधिकारी मयुर पाटील, नाशिक पूर्वचे विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता संबंधितांना पहिल्या दिवशी आपल्या विभागात काय कारवाई झाली याची माहितीच नव्हती. म्हणजे त्यांनी आयुक्तांच्याच आदेशाला केराची टोपली दाखविल्याने शहर होर्डिंगमुक्त कसे होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नाशिकरोडचे विभागीय अधिकारी सुनील आव्हाड यांना विचारले असता त्यांनी राजराजेश्वरी चौक तसेच बिटको चौकातील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही केल्याचे सांगत शुक्रवारपासून अनधिकृत होर्डिंग हटविण्यात येणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिक : अनधिकृत होर्डिंगविरोधातील मोहीमेला पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांकडून खो appeared first on पुढारी.