नाशिक : अन् तब्बल इतक्या तासांनी बछडे विसावले आईच्या कुशीत

अन् बछडे विसावले आईच्या कुशीत,www.pudhari.news

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील मन्हळ खुर्द शिवारात मंगळवारी (दि.१४) उसाच्या शेतात आढळून आलेले बिबट्याचे बछडे वनविभाग व इकोएको फाउंडेशनच्या प्रयत्नांनी चोवीस तासांत आईच्या कुशीत विसावले..

प्रदीप एकनाथ आढाव यांच्या शेतात ऊसतोड सुरु होती. सकाळी नऊच्या सुमारास कामगार ऊसतोडणीसाठी शेतात गेले असता त्यांना दोन बछडे आढळून आले. त्यांनी तत्काळ आढाव यांना माहिती दिली. आढाव यांनी पोलिस पाटील संदीप मन्हळ खुर्द यांना कळविल्यानंतर त्यांनी वनविभागाला उचलण्यासाठी खबर दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्यासह वनपरिमंडळ अधिकारी अनिल साळवे तसेच नाशिक येथील इकोएको फाउंडेशनचे वैभव भोगले, अमित लव्हाळे, नरेश चांडक यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मादी आणि बछड्यांची भेट घडविण्यासाठी त्यांनी संयुक्त कार्यवाही केली. त्यात त्याच दिवशी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मादीने एक वछड्याला उचलून सुरक्षितस्थळी हलविले. मात्र एक बछडा ऊसाच्या शेतातच होता. त्यामुळे पुन्हा कार्यवाही करुन वनविभागने मायलेकरांची भेट घडविण्यासाठी प्रतीक्षा केली. बुधवारी (दि, 15) सायंकाळी दुसरा बछडाही आईच्या कुशीत विसावला.

मायलेकरांची भेट ट्रॅप कॅमेऱ्यात कैद

दरम्यान, एका बछड्याला त्याच दिवशी मादीने सुरक्षितस्थळी हलवले. मात्र दुसरा बछडा शेतातच सोडला होता. त्यामुळे या बछड्यालादेखील आईची भेट घडविण्याचे आव्हान वनविभाग व इकोएको फाउंडेशनपुढे होते. तथापि, भुकेने व्याकुळ बछड्याला नांदूरशिंगोटे येथील कार्यालयात आणून दूध पाजण्यात आले. त्यानंतर पुन्हा मन्हळ येथील उसाच्या शेतात ठेवण्यात आले. मादीने सायंकाळी सहाच्या सुमारास बछड्याला अलगद उचलले. मायलेकरांची भेट ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली.

The post नाशिक : अन् तब्बल इतक्या तासांनी बछडे विसावले आईच्या कुशीत appeared first on पुढारी.