नाशिक : अपहृत अल्पवयीन मुलीची सुटका; तरुणास अटक

अटक,www.pudhari.news

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
शहरातून बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणार्‍या इमरान राजू शेख या तरुणाला अटक झाली आहे. दरम्यान, या मुलीचे अपहरण करून तिचे बळजबरीने धर्मांतर केले गेल्याचा आरोप होत असून, मुलीच्या अपहरणासह एकूणच गुन्ह्यात सहभागी सर्व आरोपींना अटक करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.

‘विहिंप’चे जिल्हा सहमंत्री मच्छिंद्र शिर्के, धर्मप्रसार प्रमुख भावेश भावसार आणि अ‍ॅड. मंजुषा कजवाडकर यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची माहिती दिली. शहरातील 14 वर्षीय मुलगी दि. 24 ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाली होती. या प्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तपासाची चक्रे फिरविली गेली. त्यात ती दि. 14 नोव्हेंबरला सुरतला मिळून आली. सहायक पोलिस निरीक्षक प्रिती सावजी यांनी महिला दक्षता समितीच्या सदस्य संगीता चव्हाण यांच्या समक्ष तिची विचारपूस केली. त्यात पीडितेने घटनाक्रम सांगितला. त्यात तिने इमरान शेखने प्रेमसंबंधातून लग्नाचे आमिष दाखवून लांजाजवळील मुंजारवाडी (रत्नागिरी) येथे त्याच्या नातेवाइकाकडे पळवून नेले. त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानुसार संबंधितावर भादंवि कलम 366 (अ), 376 सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधित अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिस उपअधीक्षक प्रदीपकुमार जाधव हे तपास करीत आहेत.

या गंभीर प्रकरणात लक्ष घालणारे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, कॅम्प विभागाचे अधिकारी जाधव यांच्यासह पथकाचे आभार मानण्यात आले. खासदार डॉ. सुभाष भामरे, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनीदेखील या प्रकरणाच्या तपासकार्यात लक्ष घातल्याने पीडितेची सुटका होण्यास मदत झाल्याचे शिर्के यांनी सांगितले.

सहआरोपींना अटक व्हावी
दरम्यान, या गुन्ह्यात इमरानला त्याच्या आप्तांनी साथ दिली असल्याने त्यांनाही सहआरोपी करून त्यांना अटक करावी, अशी मागणी ‘विहिंप’ने केली आहे. पीडितेला मांत्रिकाकडे नेण्यात येऊन तिचे धर्मांतर करण्यात आले. नंतर तिचा निकाह लावण्याचा प्रयत्न झाला. मात्र तिने नकार देत घरी परतण्याची मागणी केली. तेव्हा त्यास स्पष्ट नकार देण्यात येऊन दबाव टाकला गेल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या घटनाक्रमानुसार पीडितेच्या गळ्यात तावीज बांधणारा मांत्रिक तसेच धर्म व नाव बदलणारा काझी, इमरान मदत करणारा त्याचा मित्र, सुरत येथे त्यांना ठेवून घेणारा नातेवाईक या सर्वांना अटक झाली पाहिजे, असे मुद्दे अ‍ॅड. कजवाडकर यांनी मांडले.

हेही वाचा :

The post नाशिक : अपहृत अल्पवयीन मुलीची सुटका; तरुणास अटक appeared first on पुढारी.