Site icon

नाशिक : अब बचे सिर्फ ‘पंधरा’…, गळतीनंतर शिवसेना कार्यालयाचा बोर्ड चर्चेत

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

नाशिकमध्ये आज शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले. महानगरपालिकेतील शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह शिवसेनेच्या 11 माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे वर्षा बंगल्यावर शिंदे गटात प्रवेश केला. आजच्या या प्रवेशानंतर नाशिकमधील ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाने पत्रकारपरिषद घेत या माजी नगरसेवकांचा समाचार देखील घेतला आहे. अशातच आता चर्चेत आला आहे, तो म्हणजे येथील शिवसेनेच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचा बोर्ड….

जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाच्या बोर्डावर असलेले अजय बोरस्ते यांचे नाव आज संतप्त शिवसैनिकांनी खोडले. शिवसेनेत अजय बोरस्ते यांनी सगळी पदे भोगली. तरीही त्याने असे केले असा संताप शिवसेना पदाधिका-यांनी व्यक्त केला. यापूर्वी हेमंत गोडसे, दादा भुसे व सुहास कांदे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती. त्यावेळेला यातिघांचे या बोर्डावरील नाव खोडण्यात आले होते. आज अजय बोरस्ते यांचे नाव खोडण्यात आल्याने शिवसेना कार्यालयाचा हा बोर्ड चांगलाच चर्चेत आला आहे.

या बोर्डावरील एक एक नाव हळूहळू कमी होत असून, खोडले जात असल्याने बोर्डच बदलण्याची वेळ येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या बोर्डावर एकुण 19 नावे होती. त्यापैकी शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख संजय राऊत यांच्यासह जिल्हा प्रमुख विजय करंजकर, रविंद्र मिर्लेकर, सुधाकर बडगुजर, बबन घोलप, सुनिल पाटील, भाऊसाहेब चौधरी, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, विलास शिंदे, सुनिल बागुल, विनायक पांडे, दत्ताजी गायकवाड, वसंत गिते, जयंत दिंडे अशी पंधरा नावे आजूनही आहेत. तर हेमंत गोडसे, दादा भुसे, सुहास कांदे व अजय बोरस्ते अशी चार नावे खोडण्यात आल्याने शिंदे गटात अशाच पद्धतीने इनकमिंग होत राहिली आणि ठाकरे गटाला सोडचिठ्ठी मिळत राहिली तर कार्यालयाचा हा बोर्डच बदलण्याची वेळ येते की काय अशी चर्चाही रंगू लागली आहे.

The post नाशिक : अब बचे सिर्फ 'पंधरा'..., गळतीनंतर शिवसेना कार्यालयाचा बोर्ड चर्चेत appeared first on पुढारी.

Exit mobile version