नाशिक : अर्थिक समीकरण बिघडले; टोमॅटोचे भाव घसरल्याने बळीराजाच्या पदरी निराशा

dindori www.pudhari.news

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा

गेल्या दहा दिवसापासून चालू हंगामात टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाल्याने उत्पादन खर्च देखील वसुल होणे  कठिण झाल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे. सध्या कर्नाटक, आंधप्रदेश, मध्य प्रदेशाचा टोमॅटो बाजारात दाखल झाल्याने टोमॅटो बाजारात घसरण होत असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे टोमॅटोचा भाव ८०० कॅरेटवरून २५० ते ३०० रुपये कॅरेटवर आला आहे.

अतिवृष्टीनंतर टोमॅटो उत्पादनात मोठी घट झाली. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे टोमॅटो पिकाला पोषक वातावरण मिळले नसल्याने सुकवा, फुलगळ, व्हायरस, फळकिड, नागअळी यामुळे टोमॅटो उत्पादनावर मोठा परिणाम होऊन उत्पादनात घट झाली आहे. त्यात परतीच्या पावसानेही थैमान घातल्याने टोमॅटो पिकांचे अतोनात  नुकसान होऊन बळीराजाच्या पदरी निराशा आली आहे. काही शेतक-यांनी टोमॅटो पिक वाचवून पुन्हा उभे केले. मात्र, गडगडलेल्या बाजारभावामुळे पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल झाला आहे.

दिंडोरी तालुक्यात सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक द्राक्षबागा तोडल्या जात असून त्यात टोमॅटो लागवड केली जात आहे. परंतु वातावरणातील होणारे बदल पाहता द्राक्षापेक्षाही टोमॅटो पिकाला होणारा खर्च जास्त होताना दिसत आहे. त्यात रासायनिक खताचे वाढलेले बाजार त्यात खताची टंचाई व रासायनिक खतावर होणारी लिकिंग यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतकरी मेटाकुटीला आला असून यंदाच्या हंगामात टोमॅटो उत्पादनात मोठी घट होऊन अपेक्षित उत्पादन खर्चही निघत नाही. रासायनिक खते, औषधे, किटकनाशके याच्या किंमतीत मागील वर्षाच्या तुलनेत दीड ते दोन टक्के वाढल्या आहेत. या वाढीव किंमतीवर पुन्हा अठरा टक्के वस्तू व सेवा (जीएसटी) आकारला जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : अर्थिक समीकरण बिघडले; टोमॅटोचे भाव घसरल्याने बळीराजाच्या पदरी निराशा appeared first on पुढारी.