नाशिक : अल निनोचे संकट दाटल्यास जनावरांच्या चाऱ्याचे काय? जिल्ह्यात किती साठा?

जनावरांना चारा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात मार्चअखेरीस १२ लाख ३७ लाख ४०५ मेट्रिक टन जनावरांसाठीचा चारा उपलब्ध आहे. महिन्याकाठी जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याची सरासरी बघता सप्टेंबर अखेरपर्यंत हा साठा पुरेल असा अंदाज आहे. त्यामूळे दुर्दैवाने जिल्ह्यावर अल निनोेचे संकट दाटले, तरी जनावरांच्या चाऱ्याची टंचाई भासणार नाही.

अल निनो संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा मान्सून लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद‌्भवणाऱ्या संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. संकटाच्या याकाळात जनावरांचे हाल टाळण्यासाठी पशुसंवर्धन विभागानेही कंबर कसली आहे. अल निनोचे संकट उभे ठाकल्यास जनावरांचा चारा व पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विभागाकडून सूक्ष्म नियोजनावर भर दिला जातोय.

जिल्ह्यात ११ लाख २६ हजार २८४ पशुधन आहे. त्यामध्ये मोठ्या जनावरांची संख्या ८ लाख ९२ हजार ६०४ इतकी आहे. लहान जनावरे २ लाख २३ हजार ६८० आहेत. यासर्व जनावरांना दरमहा १ लाख ८० हजार ८०० मेट्रिक टन चारा लागतो. जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामाचा विचार करता, २१ लाख ४१ हजार ४०५ मेट्रिक टन चाऱ्याचे उत्पादन झाले आहे. त्यापैकी मार्च अखेरीस ९ लाख ४० हजार मेट्रिक टन चारा जनावरांसाठी वापरून झाला आहे. सद्यस्थितीत १२ लाख ३७ हजार ४०५ मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. जनावरांना महिन्याकाठी लागणार चारा व सध्याची उपलब्धता विचारात घेता सप्टेंबर एण्डपर्यंत तो पुरेल, असा अंदाज आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.

उपलब्ध चारा (मे. टन)

मालेगाव 1,04,817, बागलाण 71,996, कळवण 50,484, नांदगाव 54,441, सुरगाणा 49,239, नाशिक 49,588, दिंडोरी 55,609, इगतपुरी 41,885, पेठ 28,700, निफाड 64,782, सिन्नर 94,853, येवला 71,948, चांदवड 52,372, त्र्यंबकेश्वर 49,155, देवळा 35,936, एकूण 12,37,405.

2019 मध्ये चारा वाहतूक बंदी

२०१९ मध्ये जिल्ह्यावर दुष्काळी सावट होते. त्यावेळी उपलब्ध चाऱ्याचा आढावा घेत जिल्हा प्रशासनाने परजिल्ह्यात चारा वाहतुकीवर बंदी घातली होती. यंदाच्या वर्षी तालुक्यांमध्ये उपलब्ध चारा व त्याचे नियोजन केल्यास तो सर्व तालुक्यांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकतो.

हेही वाचा : 

The post नाशिक : अल निनोचे संकट दाटल्यास जनावरांच्या चाऱ्याचे काय? जिल्ह्यात किती साठा? appeared first on पुढारी.