नाशिक : अवकाळीचा जिल्ह्याला फटका; २३,७०० हेक्टरवरील पिके पाण्यात

अवकाळी पाऊस, द्राक्ष नुकसान,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात ७ ते १२ एप्रिल या काळात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ४६७ गावांमधील २३ हजार ६९८.६४ हेक्टरवरील पिके पाण्यात गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान होऊन तब्बल १८,३४६.४७ हेक्टरवरील कांदा मातीमोल झाला आहे. जिल्ह्यातील ३६,४४२ शेतकऱ्यांना या पावसाने तडाखा दिला आहे.

गेल्या आठवड्यात राज्याला अवकाळीने झोडपून काढले. नाशिक जिल्ह्यातही ठिकठिकाणी गारपिटीसह अवकाळीने तडाखा दिला. त्याचा फटका शेतीपिकांना बसला आहे. महसूल विभागाने कृषीच्या सहाय्याने नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेतला. त्यानुसार या पावसाने कांदा पिकाची सर्वांत जास्त हानी झाली आहे. त्याखालोखाल १०१६.४९ हेक्टरवरील द्राक्षपिकांची नासाडी झाली. तसेच १४५४ हेक्टरवरील भाजीपाला, ८७२ हेक्टर डाळिंब, ५३६.७ हेक्टरवरील गहू, ४६४ हेक्टर आंबा, ३६८ हेक्टर मका पाण्यात गेला आहे. टोमॅटो व बाजरीचे अनुक्रमे २५५.२, तर २२२ हेक्टरचे नुकसान झाले आहे. याशिवाय अन्य पिकांनाही फटका बसला आहे.

जिल्ह्यात सटाण्याला अवकाळीने सर्वांत जास्त झोडपले आहे. तालुक्यातील १२६०४ हेक्टरवरील शेतीपिके पाण्यात गेली. नांदगावी ५ हजार ३०५, निफाडमध्ये 1074.19 तसेच मालेगावला ६६६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. अन्य तालुक्यांतही शेतीपिकांच्या नुकसानीची तीव्रता अधिक आहे. दरम्यान, पाऊस उघडल्यामुळे पंचनाम्यांना वेग आला आहे. मात्र, नुकसानीची तीव्रता बघता अंतिम आकडेवारी आणखीन काही काळ लागणार आहे. नुकसानीच्या आकड्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अवकाळीचे नुकसान

तालुका       गावे            क्षेत्र (हेक्टर)

मालेगाव     २३             666

सटाणा        46            12604.3

नांदगाव      53            5304.8

कळवण      25             518.5

देवळा          6              354.4

दिंडोरी        17             130.6

सुरगाणा     6               568.45

नाशिक      53              597.30

पेठ                22                  9 118.20

इगतपुरी      23                  544.00

निफाड        46                   1074.19

सिन्नर       26                   377.30

चांदवड       11                   839.40

येवला          2                    1.20

एकूण          467                23698.64

– अवकाळीचा ४६७ गावांना दणका

– तब्बल ३६,४४२ शेतकरी बाधित

– २१३१२.७५ हेक्टर बागायती पिके पाण्यात

– २३८५.८९ हेक्टर बहुवार्षिक पिकांना फटका

हेही वाचा : 

The post नाशिक : अवकाळीचा जिल्ह्याला फटका; २३,७०० हेक्टरवरील पिके पाण्यात appeared first on पुढारी.