नाशिक : अवैधरीत्या गर्भलिंग निदान प्रकरणी ११ जणांविरोधात खटला दाखल

सोनोग्राफी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोडमधील श्री बालाजी रुग्णालयात अवैधरीत्या गर्भलिंग निदान करणारे सोनोग्राफी मशीन सापडल्या प्रकरणी मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी यांच्यासह नऊ डॉक्टरांसह ११ जणांविरुध्द गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्यांतर्गत (पीसीपीएनडीटी) नाशिकरोड न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी (दि.९) महापालिकेच्या विशेष सरकारी वकिलाने न्यायालयात खटला दाखल केला असून, पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत खटला चालविला जाणार आहे. यामुळे डॉ. भंडारी दाम्पत्यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे. तसेच डॉ. भंडारींवर बडतर्फीची कारवाई करण्याचा सुधारित प्रस्ताव मंगळवारी (दि.१०) प्रशासनाकडे सादर करण्यात येणार आहे. मनपाचे वैद्यकीय अधिकारी तथा बिटको रुग्णालयाचे प्रमुख डॉ. भंडारी यांच्या मालकीच्या खासगी रुग्णालयात अनधिकृतपणे सोनोग्राफी मशीन आढळून आले होते. कायद्यानुसार कोणतेही मशीन हॉस्पिटलमध्ये सुरू करण्याआधी अथवा ते बाळगण्यास महापालिका वैद्यकीय विभागाची परवानगी बंधनकारक असते. गेल्या १६ डिसेंबर रोजी नाशिकरोड येथील देवळाली गाव परिसरात श्री बालाजी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मनपा पथकाने टाकलेल्या धाडीत अनधिकृत सोनोग्राफी मशीन आढळून आले होते. विशेष म्हणजे संबंधित रुग्णालयाचा परवानादेखील नाही. रुग्णालयाची इमारत डॉ. भंडारींच्या मालकीची आहे. त्यांच्या नावाने हे रुग्णालय सुरू होते. मनपाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी मशीनसह रुग्णालय सील केले. या प्रकरणाची गंभीर दखल आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घेत डॉ. भंडारी दाम्पत्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच अनधिकृतपणे सोनोग्राफी मशीन आढळल्याने पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत न्यायालयामार्फत गुन्हा दाखल झाला आहे.

सोमवारी नाशिकरोड प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात खटला दाखल झाला. यात डॉ. भंडारी दाम्पत्यांसह शुभम हॉस्पिटलचे तत्कालीन संचालक असलेले सहा डॉक्टर आणि हॉस्पिटल एका वर्षासाठी भाडेतत्त्वावर घेणारे एक डॉक्टर अशा नऊ डॉक्टरांना संशयित आरोपी करण्यात आले आहे. तसेच ज्या कंपनीचे मशीन आहे, त्या कंपनीचा मालक आणि मशीन घेण्यासाठी कर्ज देणाऱ्या एका बँक मॅनेजरविरोधातही खटला दाखल झाला आहे. या कायद्यांतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास तीन ते पाच वर्षांपर्यंत शिक्षा व ५० हजारांच्या दंडाची तरतूद आहे.

गेल्या २८ डिसेंबरला वैद्यकीय विभागाने भंडारींवर कारवाईचा प्रस्ताव प्रशासनाला सादर केला होता. परंतु, प्रस्तावात त्रुटी असल्यामुळे फेरप्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी (दि.१०) वैद्यकीय विभागाकडून कारवाईचा फेरप्रस्ताव सादर केला जाणार आहे.

अवैधरीत्या सोनोग्राफी मशीन बाळगणे आणि ठेवल्याप्रकरणी संबंधित कायद्यांतर्गत डॉ. भंडारींसह नऊ डॉक्टर, बँकेचा एक व्यवस्थापक आणि आणखी एक अशा ११ लोकांविरोधात सोमवारी खटला दाखल करण्यात आला आहे.

– डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, मनपा

यांच्यावर दाखल झाला खटला

महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी, हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुनीता भंडारी, ईआरबीएयएस इंजिनिअरिंग कंपनी, तत्कालीन बँक मॅनेजर- बँक ऑफ महाराष्ट्र नाशिकरोड, शुभम हॉस्पिटलचे संचालक डॉ. विजय पवार, डॉ. विजय ज्योती, डॉ. अजित जुनागडे, डॉ. शरद गोतरकर, डॉ. प्रशांत भुतडा, डॉ. सतीश पात्रीकर, डॉ. राजेंद्र जाधव यांचा खटला दाखल झालेल्यात समावेश आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : अवैधरीत्या गर्भलिंग निदान प्रकरणी ११ जणांविरोधात खटला दाखल appeared first on पुढारी.