Site icon

नाशिक : ‘अशोका’च्या अवकाश संशोधन केंद्रास ‘इस्रो’तर्फे मान्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भारतीय अवकाश संशोधन संस्था, इस्रोतर्फे नुकतेच अशोका शिक्षणसंस्थेस अवकाश संशोधन क्षेत्रात अधिकृत शैक्षणिक केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. याद्वारे अशोका स्कूलतर्फे आता विद्यार्थ्यांना भविष्यात ‘अवकाश संशोधन शास्त्र’ या विषयातील शिक्षण व संशोधन करण्यास प्रोत्साहन मिळेल.

इस्रोतर्फे निवडल्या गेलेल्या 28 संशोधन संस्थांपैकी अशोका संशोधन संस्था ही नाशिकमधील एकमेव संस्था आहे. 5 ऑगस्ट रोजी बंगळुरू येथे राष्ट्रीय शिक्षणसंस्थेचे किरणकुमार, इतर सदस्य तसेच अवकाश संशोधन संस्थेचे माजी सचिव, संपूर्ण अवकाश संशोधन संस्था या सर्वांतर्फे स्पेस ट्यूटर कार्यक्रमाची घोषणा केली गेली. अशोका स्कूलतर्फे अवकाश संशोधन मार्गदर्शक अपूर्वा जाखडी, अशोका संशोधन केंद्राचे आणि भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख दिलीप ठाकूर यांनी या प्रमाणपत्राचा स्वीकार केला. 2014 मध्ये अशोका ग्रुप ऑफ स्कूलतर्फे अवकाश संशोधन वेधशाळेची निर्मिती करण्यात आली. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना अवकाश संशोधन क्षेत्राविषयी अधिक माहिती मिळण्यासाठी अत्यंत उच्च दर्जाच्या सुविधा शैक्षणिक प्रोग्राम आधुनिक वेधशाळा आणि अत्याधुनिक पद्धतीची साधने तसेच तंत्रज्ञान या सर्वांचा समावेश आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना विज्ञानाचा अभ्यासक्रम, विविध उपक्रम, स्वाध्याय, प्रतिकृती, चर्चा- परिसंवाद आणि प्रकल्प यांच्या माध्यमातून शिकवला जातो. या उपक्रमांतर्गत भारतातील सर्व शैक्षणिक संस्थांबरोबर विज्ञान क्षेत्रातील नवीन स्टार्टअप प्रोग्राम, त्याचबरोबर समाजसेवी संस्था, विज्ञान तंत्रज्ञान इंजीनिअरिंग आणि गणित यांच्याबरोबर समन्वय साधण्यात मदत करणार आहे. अशोका शैक्षणिक संस्थेसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. अशोका संस्थेचे अध्यक्ष अशोक कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला, विश्वस्त आस्था कटारिया सर्व शैक्षणिक प्रमुख, अवकाश संशोधन समितीचे सल्लागार डॉ. गिरीश पिंपळे, इंजिनिअर जयंत जोशी आणि तिन्ही विभागांतील शिक्षकांनी  या यशस्वी वाटचालीसाठी स्वागत केले.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘अशोका’च्या अवकाश संशोधन केंद्रास ‘इस्रो’तर्फे मान्यता appeared first on पुढारी.

Exit mobile version