नाशिक : अशोक नगरपरिसरात बिबट्याने मांडले ठाण, वनविभागची रेस्क्यू टीम दाखल

सातपूर (नाशिक) पुढारी वृत्तसेवा

सातपूर-अशोकनगर रहिवासी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन तासांपासून हा बिबट्या येथे  ठाण मांडून बसला असून वनविभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. अडीच तासांपासून रेस्क्यूसाठी प्रयत्न सुरू आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून सातपूर औद्योगिक वसाहत परिसरात बिबट्याचा मुक्त संचार दिसून येतो आहे. आज शनिवारी सकाळच्या सुमारास अशोकनगर परिसरात विकास काळे यांच्या शिवतीर्थ बंगल्याच्या बाथरूमवर (बाथरुमच्या पोटमाळ्यावर) बिबट्या बसला असल्याचे आढळून आल्याने स्थानिक नागरिकांत दहशत पसरली आहे.

ही घटना शेजारीच असलेले माजी सभापती योगेश शेवरे यांच्या निदर्शनास आल्याने शेवरे यांनी वन विभागला कळविले. सातपूर विभागाचे वनपाल ओंकार देशपांडे, वनरक्षक साहेबराव महाजन यांच्यासह वन विभागाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या गेल्या दोन तास पासून एकाच ठकाणी ठाण मांडून बसलेला असून वनविभागाची रेस्क्यू टीम दाखल झाली आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

The post नाशिक : अशोक नगरपरिसरात बिबट्याने मांडले ठाण, वनविभागची रेस्क्यू टीम दाखल appeared first on पुढारी.