नाशिक : अश्विनी देवरे पहिल्या महिला पोलिस ‘आयर्नमॅन’!, कझाकिस्तानमध्ये फडकाविला तिरंगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अत्यंत आव्हानात्मक आणि खडतर आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करून महाराष्ट्र पोलिस दलातील पहिल्या महिल्या ‘आयर्नमॅन’ होण्याचा विक्रम नाशिकच्या पोलिस नाईक अश्विनी देवरे यांनी नोंदवला आहे. कझाकिस्तानमध्ये झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत अश्विनी देवरे यांनी विक्रमी कामगिरी करत तिरंगा मानाने फडकाविला.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात कठीण मानल्या जाणार्‍या या स्पर्धेत जगभरातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये नाशिक पोलिस आयुक्तालय परिक्षेत्रातील पोलिस नाईक अश्विनी देवरे यांनी 40 ते 44 वयोगटातील स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेतील 3.8 कि.मी. स्विमिंग, 180 कि.मी. सायकलिंग व 42.2 कि.मी. धावणे हे सलग 17 तासांमध्ये पूर्ण करावे लागते. या तिन्ही लेव्हलवर अश्विनी यांनी अवघ्या 14 तास 24 मिनिटे आणि 46 सेकंद इतक्या विक्रमी वेळेत ही स्पर्धा पूर्ण केली. त्यांनी 2 तास 1 मिनिट 42 सेकंदांत स्विमिंग, 7 तास 9 मिनिटे 33 सेकंदांत सायकलिंग आणि 4 तास 53 मिनिटे 32 सेकंदांत रनिंग पूर्ण केली. स्पर्धेदरम्यानचा ट्रानझिस्ट टाइम 20 मिनिटांचा होता. ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार करून व देशाची प्रतिमा उंचावत त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षी देशाला अनोखी भेट दिली . याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्रासह विशेष पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी सातत्य फार महत्त्वाचे असते. त्यासाठी कुठलेही कारण जसे ऊन, वारा, पाऊस याचा विचार न करता सलग सराव करत राहिले. दरम्यान कोरोना कालावधीमुळे लांबलेल्या या स्पर्धेसाठी दोन वर्षांपासून पहाटे उठून नाशिक ते मालेगाव रिटर्न तसेच नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वरपर्यंत सायकलिंगचा केलेला सराव या स्पर्धेसाठी खूप मोलाचा ठरला. त्यामुळे कझाकिस्तान येथे झालेल्या या खडतर प्रवासाचे हे गोड फळ मिळाले.
– अश्विनी देवरे

40 सुवर्ण पदकांना आता पर्यंत गवसणी 

पोलिस खात्यातील कर्तव्य बजावत असताना अश्विनी यांनी दोन्ही मुलांनाही उत्तम संस्कार देऊन संसाराचा गाडा यशस्वीपणे सांभाळला आहे. त्यांनी श्रीलंका, मलेशिया तसेच भारतातील अनेक मॅरेथॉन स्पर्धांत यशस्वीरीत्या सहभाग नोंदवून 40 सुवर्णपदकांना गवसणी घातली आहे. आतापर्यंत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 21 रौप्य, 28 कांस्यपदके कमावली आहेत. आता आर्यनमॅन स्पर्धेतही बाजी मारून महाराष्ट्र पोलिस खात्याच्या शिरपेचात मानाचा सुवर्ण तुरा त्यांनी खोवला आहे.

The post नाशिक : अश्विनी देवरे पहिल्या महिला पोलिस ‘आयर्नमॅन’!, कझाकिस्तानमध्ये फडकाविला तिरंगा appeared first on पुढारी.