नाशिक : आंतरधर्मीय विवाह लावल्याने पुजाऱ्याला फासले काळे

वैदीक विवाह www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

पंचवटीतील एका विवाहसंस्थेत आंतरधर्मीय विवाह लावून देण्यात आल्याच्या घटनेमुळे संतप्त झालेल्या काही संघटनांच्या प्रतिनिधींनी संबंधित पुजाऱ्याला जाब विचारत त्याच्या तोंडाला काळे फासल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित पुजाऱ्याने पंचवटी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून काळे फासणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, संबंधित पिडीत मुलीची आईदेखील पुजाऱ्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे समजते.

पंचवटीतील काळाराम मंदिर उत्तर दरवाज्याजवळ असलेल्या उमेश (गिरीश) अरविंद पुजारी यांच्या श्रीराम वैदिक विवाह नावाच्या संस्थेत आंतरधर्मीय विवाह लावून देण्यात आल्याचा प्रकार काही संघटनांना माहिती होताच त्यांनी सदर प्रकरणाबाबत विचारणा करण्यासाठी त्या विवाह संस्थेच्या कार्यालयात धाव घेतली. उमेश पुजारी जाब विचारला असता त्यांनी सांगितले की, सदर मुलगा आणि मुलगी हे तीन ते चार वेळा माझ्या कार्यालयात येऊन गेले. त्यानंतर त्या मुलाने विवाहापूर्वी नोटरी करत धर्मांतर केले असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु कोणत्याही प्रकारची कागदपत्रे न दाखवल्याचा आक्षेप घेत त्यांना काळे फासण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी पुजारी यांनी चंदन भास्करे, शेळके आणि इतर सहकारी यांच्या विरोधात पंंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सामाजिक संघटना आक्रमक

यातील मुलगा हा ३० वर्षांचा असून मुलगी १८ वर्षांची आहे. तिच्या परिस्थितीचा फायदा घेवून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. याबाबत सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असून, कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : आंतरधर्मीय विवाह लावल्याने पुजाऱ्याला फासले काळे appeared first on पुढारी.