नाशिक : आऊटसोर्सिंगद्वारे मृत जनावरांची विल्हेवाट, मनपाचा निर्णय 

मोकाट जनावरे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेने शहरातील मृत जनावरांची विल्हेवाट आउटसोर्सिंगद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. यापूर्वी मृत जनावरांची विल्हेवाट मनपा स्वत: लावायची. त्यासाठी वर्षाला पन्नास लाखांचा खर्च यायचा. आता मात्र आऊटसोर्सिंगमुळे वर्षभरात २४ लाखांची बचत करणे शक्य होईल. चालू वर्षात प्रायोगिक तत्वावर या प्रयोगाची शहरातील नाशिक रोड, नाशिक पूर्व, नवीन नाशिक, सातपूर व पंचवटी या चार विभागांमध्ये अंमलबजावणी केली जाणार आहे. गतवर्षात मोठे व छोटे असे एकूण साडेसहा हजार मृत जनावरांची विल्हेवाट मनपाने लावली होती.

मनपाच्या विल्होळी येथील खतप्रकल्पावर जनावरे दहन करायची व्यवस्था आहे. सन २०१० पासून या ठिकाणी ही व्यवस्था आहे. मोकाट मृत जनावरे पशुवैद्यकीय विभागाकडून उचलून ती प्रकल्पावर नेत विल्हेवाट लावली जाते. तेथील विद्युत दाहिनीत एका तासाला तीनशे किलो वजनाचे जनावर जाळले जाऊ शकते. यापर्वी मृत जनावरे दफन केली जायची. मात्र, आरोग्य विषयक समस्या निर्माण झाल्याने विद्युत दाहिनीत त्याची विल्हेवाट लावण्यात येते. शहरात दिवसाला दहा-बारा जनावरे मृत पावतात. महिनाभरात हा आकडा साडेतीनशे इतका आहे. त्यामध्ये गाय, म्हशी, बैल, घोडा या मोठ्या जनावरांपासून ते अगदी शेळी, मेंढी, श्वान ते उंदिर यांचाही समावेश असतो.

पूर्वी महापालिका पशुवैद्यकीय विभाग स्वत: ही जनावरे उचलून त्याची विल्हेवाट लावायचा. पण त्यासाठी प्रत्येक विभागासाठी मनुष्यबळ व त्यांचे वेतन, वाहन, इंधन या यंत्रणेवर वर्षभरात पन्नास लाख रुपये इतका खर्च व्हायचा. पण आता हा ताण कमी करण्यासाठी पशुवैद्यकीय विभाग ठेकेदारामार्फत हे काम करणार आहे. सातपूर व प.नाशिक सोडून उर्वरीत चार विभागांमध्ये प्रायोगिक तत्वावर वर्षभरासाठी हा प्रयोग केला जाईल. त्यास यश आल्यास शहरातील सर्व विभागात त्याची अंमलबजावणी केली जाईल.

२४ तास सेवा देणे बंधनकारक
ठेकेदाराला प्रत्येक विभागासाठी दोन गाड्या व तीन माणसे नेमणे बंधनकारक असेल. शिवाय या कामाचे जीपीएस यंत्रणेद्वारे माॅनेटेरिंग केली जाईल. पशुवैद्यकीय विभागाच्या हेल्पलाईनवर मृत जनावराची माहिती मिळाल्यास ती ठेकेदाराला कळवली जाईल. आठवड्यातील सातही दिवस चोवीस तास ही सेवा देण्याची अट व शर्ती ठेक्याच्या मसुद्यात समाविष्ट केल्या आहेत.

सशुल्क सेवा
शहरात अनेकजण पाळीव प्राणी पाळतात. त्यांच्या जनावरांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची असल्यास त्यासाठी शुल्क आकारले जाईल. मोठ्या जनावरांसाठी हजार रुपये शुल्क आकारले जाईल.

गतवर्षात विल्हेवाट लावलेली जनावरे
श्वान – ३५८१, गाय – १०२३, डुक्कर – १९९, म्हैस – २४६, गाढव – १७०, बैल – २१२, घोडा – १७५, मांजर – १३५, शेळी – ४३

The post नाशिक : आऊटसोर्सिंगद्वारे मृत जनावरांची विल्हेवाट, मनपाचा निर्णय  appeared first on पुढारी.