नाशिक : आग्रा ते राजगड – गरुडझेप मोहिमेच्या साहसी खेळांनी चुकवला काळजाचा ठोका

www.pudhari.news

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
गरुडझेप मोहिमेंतर्गत आग्रा येथून राजगडच्या दिशेने निघालेल्या रॅलीचे मालेगावात जल्लोषात स्वागत झाले. शिवज्योत आणि त्यापाठोपाठ आलेल्या जत्थ्यातील तरुणांनी साहसी खेळांचे प्रात्यक्षिक दाखवत बघ्यांच्या काळजाचा ठोका चुकविला. हिंदू-मुस्लिम बांधवांनी रॅलीचे केलेले स्वागत लक्षवेधी ठरले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक आग्रा सुटकेला 355 वर्षे पूर्ण झाल्याने या इतिहासाचे स्मरण आणि प्रेरणा देण्यासाठी आग्रा ते राजगड- गरुडझेप मोहीम हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 17 ऑगस्टला 100 सायकलस्वार, चार घोडेस्वार आग्राहून मार्गस्थ झाले. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यातून मजल दरमजल करीत ही मोहीम बुधवारी (दि.24) सायंकाळी मालेगाव शहरात दाखल झाली. शिवज्योत आणि त्यामागे 200 मावळे यांचे स्टार हॉटेलजवळ सत्य मालिक सेवा ग्रुप आणि जमाते उलेमा ए हिंद या संघटनांनी स्वागत केले. याठिकाणी शिवकालीन साहसी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. चित्तथरारक कसरती पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. स्वराज्यातील शिवरायांचे विश्वासू पायदळ प्रमुख सरनोबत नरवीर पिलाजी गोळे यांचे 14 वे वंशज मारुती गोळे, दिग्विजय जेधे या मोहीम प्रमुखांच्या हस्ते शिवतीर्थावर शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पांजली वाहण्यात आली. यानंतर संगमेश्वरातील दत्तमंदिर चौकात सम्राट मंडळाच्या मैदानात विविध सामाजिक, राजकीय संघटनांच्या वतीने सत्कार समारंभ पार पडला. प्रमुख पाहुण्यांसमोर उर्दू माध्यमाच्या विद्यार्थिनींनी शिवरायांच्या जीवनावर हिंदीमध्ये भाषण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मामको बँकेचे राजेंद्र भोसले होते. यावेळी अनिल पाटील, ताऊ परदेशी, अमोल निकम, रामचंद्र जेधे, किरण पाटील, डॉ. सचिन बोरसे, दीपक पाटील, डॉ. संतोष पाटील, अनिल भुसे, दीपक जगताप, शरद बच्छाव, मंगेश निकम, कैलास शर्मा, युनूस मोहम्मद, मनोज गोसावी, रावसाहेब निकम, डॉ. तौहिद, मुझम्मील रहिमी, प्रसाद कासार, गौरव शेलार, मोहन हिरे आदी तरुण उपस्थित होते.

पेन, लॉगबुक भेट :
मोहिमेचे झोडगे, चाळीसगाव फाटा येथेही ग्रामस्थांनी स्वागत केले. मोसम पूलमार्गे महामार्गाने रॅली पुढे मार्गस्थ झाली. पाटणे फाटा येथेही स्वागत सत्काराचा कार्यक्रम झाला. जाफरनगरला गुलिस्ता डेअरीतर्फे रॅलीत सहभागी तरुणांना सरबत वाटप झाले. जावीद अन्सारी यांनी त्या कार्यकर्त्यांना पेन व लॉगबुकची भेट दिली.

हेही वाचा:

The post नाशिक : आग्रा ते राजगड - गरुडझेप मोहिमेच्या साहसी खेळांनी चुकवला काळजाचा ठोका appeared first on पुढारी.