नाशिक : आजपासून सुरु होणाऱ्या एशियाड सर्कसमध्ये दक्षिण अफ्रिकेच्या कलाकारांचे सादरीकरण

एशियाड सर्कस  www.pudhari.news 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात अनेक वर्षांनंतर सर्कस आयोजित करण्यात आली आहे. देशातील नावाजलेली एशियाड सर्कस पहिल्यांदाच शहरात प्रयोग सादर करणार आहे. याबाबत झालेल्या पत्रकार परिषदेत सर्कसचे वरिष्ठ व्यवस्थापक अंकलेश्वर भास्कर यांनी दिली आहे. शासनाने जर सर्कसच्या मुद्द्याकडे गांभीर्याने बघितले नाही तर येत्या काही वर्षात सर्कस इतिहासजमा होईल, अशी खंतदेखील बोलून दाखविली. दरम्यान, शहरातील डोंगरे विद्यार्थी वसतिगृहाच्या मैदानावर ही सर्कस असून, उद्घाटन मंगळवारी (दि.7) सायंकाळी आनंद सोनवणे आणि रंजन ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

सर्कसबाबत अधिक माहीती देताना वरिष्ठ व्यवस्थापक भास्कर यांनी सांगितले की, एशियाड सर्कसमधील वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये दक्षिण अफ्रिकेचे कलाकार कला सादर करणार आहेत. त्यासोबतच देशभरातील 60 कलाकारदेखील त्यांना साथ देणार आहेत. दरम्यान, सर्कसवरील प्रेम व कलामुळे देशातील काही संस्था सर्कस पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी सर्कसमध्ये प्रेक्षकांना विविध प्राण्यांच्या कसरती असायच्या. मात्र, शासनाने प्राण्यांच्या वापरावर बंदी घातल्याने सर्कस बघण्यासाठी असलेला वर्ग बाजूला झाला आहे. मात्र,लाईव्ह कला सादर करणार्‍या कलाकारांना रसिक भरभरून दाद देत आहेत, असे देखिल भास्कर यांनी सांगितले. प्राणी, पक्षी यांच्या सर्कशीतील वापरास बंदी घातल्याने सर्कशीचे आकर्षण कमी होत गेले. त्यातच दोन वर्ष करोनामुळे अनेक सर्कस कंपन्यांना आपले अस्तित्व टिकवता आले नाही. त्यामुळे भारतातील सुमारे 200 ते 250 पैकी केवळ 5 ते 10 सर्कस कंपन्या अस्तित्वात आहेत. लॉकडाऊननंतरचा केवळ पाचवा शो सुरू होत आहे. यापूर्वी जयपूर, उदयपूर, इंदौर या ठिकाणी सर्कशीचे शो झाले आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : आजपासून सुरु होणाऱ्या एशियाड सर्कसमध्ये दक्षिण अफ्रिकेच्या कलाकारांचे सादरीकरण appeared first on पुढारी.