नाशिक : आजी, नातीचा हरपला आधार; अपघातात माय लेक ठार

माय लेक ठार,www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

पेठ रोडवरील सुदर्शन कॉलनीतील रहिवासी कुलकर्णी कुटुंबातील वैभव अशोक कुलकर्णी (३८) व त्यांची आई सुवर्णा अशोक कुलकर्णी (६०) यांचा रविवारी (दि. ११) सकाळी सिन्नरजवळील वावी येथे अपघाती मृत्यू झाल्यामुळे मृत आजी-नातीचा आधार हरपला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कुलकर्णी कुटुंब हे मूळचे वावी (ता. सिन्नर) येथील असून, ते सध्या पंचवटी परिसरात वास्तव्यास आहेत. एचडीएफसी बँकेत वसुली विभागात नोकरी करत असलेले वैभव यांना रविवार सुट्टी असल्याने ते गावी शेतीकडे दुचाकीने जात होते. वावीजवळ पंपावर पेट्रोल भरून रस्ता ओलांडत असताना कारने धडक दिली. यात दोघांचाही मृत्यू झाला. अविवाहित असलेल्या वैभव कुलकर्णी यांच्या वडिलांचे दहा वर्षांपूर्वीच निधन झाले असून, दोन बहिणींचा विवाह झालेला आहे. सध्या ते आई, आजी व एक अविवाहित बहीण असे चौघे एकत्र राहत होते. सकाळी अपघाताची बातमी शेजारील कैलास सोनवणे यांना मिळाली. मात्र, त्यांनी अपघातात केवळ दोघे जखमी झाल्याची बाब वैभवच्या आजी (आईची आई) पुष्पावती कृष्णाजी देशपांडे (९१) यांना सांगितली. तसेच, त्यांना स्वत:च्या घरी ठेवण्यात आले. चार वाजले तरी पुढील निरोप काही कळेना, म्हणून आजीने घरी जाण्याचा हट्ट धरत घराकडे धाव घेतली. मात्र,

घराबाहेर तिरडी बांधण्याचे काम सुरू होते. ते बघितले अन् आपली मुलगी व नातू गेल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी एकच हंबरडा फोडला. दरम्यान, आजी पुष्पावती देशपांडे यांचा मुलगा अरुण देशपांडे यांचे दोन वर्षांपूर्वीच कोरोनाने निधन झाले होते. त्यामुळे त्या मुलगी सुवर्णा यांच्याकडे राहत होत्या. आता अपघातात मुलगी व नातू या दोघांचे निधन झाल्याने त्यांचा व नातीचा मुख्य आधारच हरपला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : आजी, नातीचा हरपला आधार; अपघातात माय लेक ठार appeared first on पुढारी.