नाशिक : आज हरिहर भेट, त्रिपुरारी पौर्णिमेला उद्या त्र्यंबकराजाची मिरवणूक

हरिहर भेट www.pudhari.news

नाशिक (त्र्यंबकेश्वर)  : पुढारी वृत्तसेवा
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे सोमवारी (दि. 7) त्रिपुरारी पौर्णिमेस देवदिवाळीनिमित्त होणार्‍या रथोत्सवाची जंगी तयारी सुरू झाली आहे. रथोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेला, 157 वर्षांपूर्वीच्या तब्बल 31 फूट उंचीच्या लाकडी रथास सजावट केली जात आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वराचे देणगी दर्शन सोमवारी दुपारी 12 नंतर बंद राहणार आहे.

पेशव्यांचे सरदार रघुनाथ विंचुरकर यांनी 3 नोव्हेंबर 1865 ला हा रथ देवस्थानास दिला होता. संपूर्ण शिसवी लाकडात बांधलेल्या या रथासाठी त्या काळी 12 हजार रुपये खर्च आला होता. जयपूर येथील माणिकचंद रजपूत यांनी हा रथ तयार केला आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे दरवर्षीप्रमाणे पूर्वापार परंपरेनुसार वैकुंठ चतुर्दशी व कार्तिक पौर्णिमेनिमित्त रथोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. रविवारी,दि. 6 रात्री 11 ते उत्तर रात्री 1.30 वाजेपर्यंत वैकुंठ चतुर्दशीची विशेष महापूजा, पालखी सोहळा व हरिहर भेट होणार आहे. सोमवारी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी सरदार विंचुरकर यांच्या वतीने देवस्थानतर्फे दु. 1 ते 1:30 पर्यंत महापूजा होणार आहे. सोमवारी दुपारी 3 ला रथोत्सवास सुरुवात होणार असून, श्री त्र्यंबकराजाची रथातून सवाद्य मिरवणूक, कुशावर्त तीर्थावर महापूजा व सायंकाळी दि. 6 पासून मंदिरात परतीचा प्रवास असा कार्यक्रम आहे. रात्री 8 वाजता दीपमाळ प्रज्वलन व पूजन होणार आहे. स्थानिक ग्रामस्थांव्यतिरिक्त दर्शनासाठी येणार्‍या सर्व भाविकांना पूर्व दिशेला असलेल्या नूतन धर्मदर्शन मंडपातून दर्शन रांगेतून प्रवेश मिळेल. दक्षिण दरवाजा म्हणजेच गायत्री गेटने बाहेर जाण्यासाठी मार्ग आखला आहे. स्थानिक ग्रामस्थांना उत्तर महाद्वाराने पटांगणात प्रवेश देण्यात येईल. तिथून सरळ सभामंडपाच्या उत्तर दरवाजाने (जाळीच्या दरवाजाने) दर्शनासाठी प्रवेश मिळेल. स्थानिक ग्रामस्थांना आपल्यासोबत ओळखपत्र ठेवणे आवश्यक आहे. दर्शनानंतर मंदिर परिसरातून बाहेर जाण्यासाठी दक्षिण दरवाजा (गायत्री द्वार) व पश्चिम दरवाजाचा (कोठी कार्यालयाजवळील) वापर भाविकांना करता येणार आहे. मंदिराच्या पटांगणात नेमून दिलेल्या जागेतच त्रिपूर वाती लावण्याची मुभा देण्यात आली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : आज हरिहर भेट, त्रिपुरारी पौर्णिमेला उद्या त्र्यंबकराजाची मिरवणूक appeared first on पुढारी.